
मारवड पोलिसांनी शिताफीने पकडत केले न्यायालयात हजर
अमळनेर:- तब्बल २०१० पासून एका गुन्ह्याच्या खटल्यात गैरहजर राहणाऱ्या एका आरोपीला मारवड पोलिसांनी शिताफीने पकडत न्यायालयात हजर केले आहे.
शिरसाळे येथील धनराज ओंकार महाले यांच्याविरुद्ध पत्नीने हुंडा बळीची तक्रार केली होती. यात धनराज याने पत्नीला अश्लील शिवीगाळ व धमकी दिली होती. तसेच पत्नीच्या फोटोसोबत दुसराच फोटो लावून न्यायालय व इतरांना फसवण्याचा प्रयत्न केला होता म्हणून त्याच्याविरुद्ध कलम २९४, ४६५, ४६८, ४६९, ४७१ अन्वये गुन्हा दाखल होता. तो जामिनावर सुटल्यानंतर अमळनेर न्यायालयात खटला सुरू असताना २०१० पासून आजपावतो तारखेवर आरोपी हजर राहत नव्हता. त्यामुळे मा. न्यायालयाने सदर आरोपीला पकडून आणावे अशी सूचना मारवड पोलिसांना केली. त्या अनुषंगाने तपास केला असता एपीआय जिभाऊ पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून हेकॉ राजेंद्र पाटील, दिनेश पाटील, फिरोज बागवान, संजय पाटील, धनंजय देसाई यांनी ६ रोजी अमळनेर शहरातून आरोपीला जेरबंद केले व न्यायालयाच्या आदेशानुसार सुनावणीकामी न्यायालयात हजर करण्यात आले आहे.
दरम्यान आरोपीला हेडकॉन्स्टेबल दिनेश पाटील , भरत गायकवाड , राजू पाटील या पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्या यलमाने यांनी त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आणि नंदुरबार जिल्हा कारागृहात रवाना करण्याचे आदेश दिले. पोलिसांनी त्याची वैद्यकीय चाचणी करून नंदुरबार येथे जमा केले.




