
पंधरवड्यात उमेदवार निवडीचा रंगणार खेळ अन् मतदारांच्या मनधरणीसाठी इच्छुक- उमेदवारांच्या हाती २६ दिवस राहिले बाकी….
अमळनेर – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची प्रतीक्षा अखेर मंगळवार रोजी संपली. राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. १० नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर पर्यंत अर्ज भरणे, २ डिसेंबरला मतदान आणि ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. अमळनेर नगरपरिषदेच्या १ नगराध्यक्ष व ३६ नगरसेवकांच्या जागांसाठीची रणधुमाळी सुरू झाली आहे. दरम्यान मंगळवारी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. मतदारांच्या मनधरणीसाठी इच्छुक उमेदवारांकडे केवळ २६ दिवस उरले असल्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने ८ ऑक्टोबर रोजी आरक्षण जाहीर झाले होते. नगराध्यक्ष पदासाठी एसटी प्रवर्गाचे आरक्षण जाहीर झाल्यापासून अनेक इच्छुकांनी कंबर कसली होती. केवळ प्रतीक्षा होती ती निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची ही प्रतीक्षा मंगळवारी संपली. ३६ नगरसेवकांच्या जागापैकी १८ पुरुष व १८ महिलांसाठी राखीव आहेत.
निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे राजकीय हालचालींना वेग येणार आहे. दरम्यान पालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली सत्ता यावी. यासाठी माजी मंत्री आ.अनिल पाटील व माजी आमदार साहेबराव धोंडू पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शहर विकास आघाडीचा मेळावा संपन्न होऊन पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे कामाला लागले आहेत. त्याचबरोबर माजी आमदार शिरीष चौधरी यांनी शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर किंवा शिरीष दादा चौधरी मित्रपरिवार संघटनेच्या माध्यमातून पालिकेची निवडणूक लढविणार याबाबत आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. तसेच भारतीय जनता पार्टी खासदार स्मिता वाघ यांच्या नेतृत्वाखाली पालिकेची निवडणूक स्वबळावर किंवा महायुतीच्या माध्यमातून लढविता याकडे संपूर्ण शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. शहरात विरोधी पक्षाची भूमिका बजावणारी महाविकास आघाडीच्या तंबूत मात्र पालिकेची निवडणूक लढविण्याच्या संदर्भात स्मशान शांतता दिसून येत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
नगराध्यक्ष पद एसटी प्रवर्गासाठी राखीव असल्यामुळे अध्यक्ष पदासाठी सर्वश्रुत परिचित, स्थानिक, उच्चशिक्षित अन् कोरी पाटी असणारा चेहऱ्यास उमेदवारी देण्यास सर्वच पक्षांच्या पक्षश्रेष्ठींचे प्राधान्य राहील यात शंका नाही. अध्यक्षपदासाठी कोणते प्रबळ उमेदवार राहतील. याकडे आता लक्ष लागले आहे. पालिकेमध्ये मागील मोठ्या कालावधीपासून प्रशासक राज असल्यामुळे निवडणुकीची उत्सुकता लागली आहे.




