
अमळनेर(प्रतिनिधी):- तालुक्यातील जळोद गावालगत दोन वाहनांच्या झालेल्या अपघाताची सखोल चौकशी केल्यावर दोन्ही वाहनचालकांविरुद्ध अमळनेर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पो.कॉ.संदेश रामधन पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, १३ जुलै २०२५ रोजी अमळनेर चोपडा रस्त्यावरील जळोद गावाजवळ प्रवासी मजूर वाहतूक करणारी ऍपे रिक्षा (एम एच १९ बी जे ४३६५) व महिंद्रा व्हॅन (एम एच १९ सी झेड २५२२) यांचा भीषण अपघात झाला होता,यात बुधगाव ता. चोपडा येथील १५ पेक्षा जास्त महिला मजूर ऍपे रिक्षाने नंदगाव ता.अमळनेर येथे कामासाठी येत होत्या त्याच वेळी चुंचाळे ता.चोपडा येथील पवन बाविस्कर हे त्यांची आई, पत्नी,मुलगा,मुलगी यांना अमळनेर कडून चोपडा येथे घेऊन जात असताना हा अपघात झाला होता.
यात ऍपे रिक्षाचालक योगेश कोळी सहित १५ मजूर महिला जखमी झाल्या होत्या तर पवन बाविस्कर यांच्या पत्नीला देखील जबर दुखापत झाली होती.
पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी व प्रत्यक्ष साक्षीदार तपासून पाहिले असता ऍपे रिक्षात प्रवासी क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवल्याने तसेच महिंद्रा वाहनचालकाने रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज न घेता भरधाव वाहन चालवल्याने अपघात झाल्याचे समजले.त्यावरून अमळनेर पोलिसात दोन्ही वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास हेकॉ सुनील जाधव करत आहेत.




