
बेधुंद तळीरामांचा सामान्य नागरिकांसह महिलांना त्रास….
अमळनेर:- शहरात विविध ठिकाणी तळीरामांनी रात्रीच्या वेळी ड्रिंकर्स स्पॉट तयार केले असून याचा त्रास सामान्य नागरिकांसह महिलांना होत आहे.पोलिस प्रशासनाने या उघड्यावर बसणाऱ्या तळीरामांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
अमळनेर शहरातील नवीन वसाहती,खुली भूखंडे, गलवाडे रस्त्यावरील परिसर,नवजीवन सुपर शॉपी जवळील खुला भूखंड, ८० फुटी रोड या व इतर ठिकाणी रात्रीच्या वेळी दारू पिणाऱ्यांनी अक्षरक्ष कहर माजवला आहे.
वाइन शॉप किंवा बियर शॉपी वरून दारू घेऊन ती रात्रीच्या वेळी रहिवाशी भागालगत असलेल्या खुल्या भूखंडांवर पित बसणे ही जणू शहरात फॅशन बनत चालली आहे.हे महाभाग एवढ्यावरच न थांबता झिंगाट झाल्यावर मध्यरात्री जोरजोरात आरोळ्या मारणे, दुचाकीच्या सायलेन्सर मधून बुलेटचा आवाज काढणे,काचेच्या बाटल्या रस्त्यावर फोडणे यासारखे उपद्व्याप करत असतात, यामुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत.
सायंकाळच्या वेळेस शतपावली करण्यासाठी निघालेल्या महिलांना याचा सर्वाधिक त्रास होत आहे.ढेकू रस्त्यालगत असलेल्या गुलमोहर कॉलनी व त्या लगतच्या परिसरात अनेकदा सोनसाखळी चोरीचे देखील प्रकार झाले आहेत.महत्वाचे म्हणजे याच भागात शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे शिकवणी वर्ग चालत असून विद्यार्थिनीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
शहरातील विविध भागात हा प्रकार पहायला मिळत असून पोलिसांनी गस्त घालून असे प्रकार करणाऱ्या तळीरामांवर कठोर कारवाई करून त्यांना पोलिसी हिसका दाखवण्याची मागणी नागरिक करत आहेत.
अल्पवयीन विद्यार्थ्यांचा समावेश
बिअर बार व परमिट रुम मध्ये १८ वर्ष आतील मुलांना बसू दिले जात नसल्यामुळे ते सर्रास हा मार्ग अवलंबत असून यात काही १० व १२ वीच्या देखील विद्यार्थ्यांचा समावेश आहे.पालकांनी देखील आपला मुलगा काय करतोय याची दक्षता घेणे गरजेचे आहे.
प्रतिक्रिया…
शहरातील ज्या भागात असे प्रकार होत असतील,त्या भागात पोलिसांची गस्त वाढवली जाईल.दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. – दत्तात्रय निकम, पोलिस निरीक्षक,अमळनेर




