
अमळनेर : जागतिक बँक अर्थसहाय्यित नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) टप्पा 2 अंतर्गत ८ रोजी अमळनेर व पारोळा तालुका स्तरावर अनिवासी कृषी ताईंसाठी विशेष प्रशिक्षणाचे आयोजन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
या प्रशिक्षणात कृषी ताईंना प्रकल्पातील विविध योजना, हवामान अनुकूल कृषी पद्धती आणि शेतकऱ्यांपर्यंत माहिती प्रभावीपणे कशी पोहोचवावी, याबद्दल सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
तांत्रिक प्रशिक्षक कृषी अधिकारी अविनाश खैरनार यांनी अत्यंत प्रभावीपणे प्रशिक्षण दिले. त्यांनी कृषी ताईंना प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक आणि व्यावहारिक बाबींची माहिती दिली. व मनिषा पाटील यांनी महिला गट स्थापना बद्दल माहिती दिली. यावेळी महिला सहायक कृषी अधिकारी उपस्थित होते. तसेच मोठ्या संख्येने अनिवासी कृषी ताईंनी या प्रशिक्षणात सहभाग घेतला.
उपविभागीय कृषी अधिकारी चंद्रशेखर साठे यांनी कृषी ताईंना प्रकल्पाचे महत्त्व समजावून सांगितले आणि शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रभावीपणे काम करण्याचे आवाहन केले. कृषी अधिकारी व प्रशिक्षक अविनाश खैरनार व चंद्रकांत ठाकरे यांनीही कृषी ताईंच्या भूमिकेचे कौतुक केले आणि त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक शीतल पाटील यांनी केले. या प्रशिक्षणातून कृषी ताईंना मिळालेल्या माहितीमुळे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 ची अंमलबजावणी अमळनेर व पारोळा तालुक्यात अधिक गतीने व प्रभावीपणे होण्यास मदत मिळणार आहे.




