
अमळनेर :- तालुक्यातील एकलहरे, एकतास व निम येथील पशुधन चोरीला गेले असून तालुक्यात गुरे चोरणाऱ्या टोळीने धुमाकुळ घातला असून पोलिसांनी त्याचा बंदोबस्त करा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
एकलहरे येथील प्रफुल्ल सीताराम पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ९ रोजी सकाळी ते दूध काढण्यासाठी गेले असता त्यांच्या गोठ्यात दोन गायी गोठ्यात दिसून आल्या नाहीत. एकतास येथील शेतकरी दादाभाऊ बारकु भोई हे यांची एक गाभण गाय, एक गोऱ्हा, व एक वासरू चोरीस गेल्याचे ९ रोजी सकाळी उघडकीस आले. तसेच निम येथील श्रीकांत बळीराम चौधरी यांच्या मालकीचे एक खिल्लारी बैल, एक गोऱ्हा, व एक पारडू बांधलेल्या ठिकाणी दिसून आले नाहीत. शेतकऱ्यांनी आजुबाजूच्या परिसरात शोध घेतला असता गुरांचा काहीच तपास लागला नाही. त्यामुळे त्यांनी मारवड पोलिस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. एकूण ४४,५०० रुपये किमतीची आठ गुरे चोरून नेल्याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हेकॉ संजय सूर्यवंशी हे करीत आहेत.
गुरे चोरणाऱ्या टोळीचा बंदोबस्त करण्याची मागणी…
तालुक्यात गुरे चोरी करणाऱ्या टोळीने धुमाकुळ घातला असून आतापर्यंत शेतकऱ्यांची लाखो रुपयांची गुरे या चोरट्यांनी चोरून नेली आहेत. याप्रकरणी दाखल अनेक गुन्ह्याचा तपास अद्यापही लागला नसून पोलिसांनी धडक मोहीम राबवत ह्या गुरे चोरांचा कायमचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे. आधीच नापिकी आणि अत्यल्प उत्पन्नाने पिचलेला शेतकरी गुरेचोरीमुळे हवालदिल झाला असून ह्या गुरे चोरीला आळा घालावा अशी मागणी तालुक्यातून होत आहे.




