
अमळनेर पोलिसांच्या धडाकेबाज कामगिरीचे कौतुक करत पोलिस अधीक्षकांनी दिले रोख बक्षीस…
अमळनेर : शहरासह विविध ठिकाणी मोटारसायकली चोरणाऱ्या शहादा तालुक्यातील दोघांना अमळनेर पोलिसांनी शिताफीने अटक करून त्यांच्याकडून १५ लाख ६३ हजार रुपयांच्या २४ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. अमळनेर पोलिसांना विशेष बक्षीस देण्यात येत असल्याची माहिती पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अमळनेर शहरासह विविध ठिकाणाहुन दररोज मोटारसायकली चोरीस जात होत्या. पोलिसांसह सामान्य नागरिक परेशान होते. अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि डीवायएसपी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज , प्रशांत पाटील , गणेश पाटील , उज्वलकुमार म्हस्के , नितीन मनोरे , उज्वल पाटील ,हितेश बेहरे यांच्या पथकाला तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाना केले. पोलीस पथकाने विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करून आरोपीचे चेहरे निष्पन्न केले. हे दोन्ही आरोपी हिम्मत रेहंज्या पावरा , अंबालाल भुरट्या खर्डे रा सातपिंप्री ता शहादा जिल्हा नंदुरबार येथील असल्याचे समजले. आरोपी जंगलातून विविध ठिकाणी जात असल्याने पोलिसांना खूप पायपीट करावी लागली. मात्र पोलिसांनी माहितीच्या आधारे त्यांचा पाठलाग करून त्यांना धडगाव येथून ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांना खाक्या दाखवताच त्यांनी विविध ठिकाणाहून १५ लाख ६३ हजार रुपयांच्या २४ मोटारसायकली चोरल्या आणि विविध गरीब लोकांना विकल्याची कबुली दिली. पोलिसानी संपूर्ण जंगलातून सर्व २४ मोटरसायकली हस्तगत केल्या. दोन्ही आरोपीना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दोघा चोरत्यांकडून मोठ्या प्रमाणावर मोटारसायकली आणि जंगलातून आरोपी पकडून आणल्याने पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी अमळनेर पोलिसांना कौतुकाची थाप देऊन रोख रकमेचे बक्षीस देखील दिले. गुन्हयाचा पुढील तपास हेडकॉन्स्टेबल काशिनाथ पाटील, सागर साळुंखे करीत आहेत.
पत्रकार परिषदेच्या वेळी डीवायएसपी विनायक कोते , पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम , पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड , पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज हजर होते.




