
मारवड परिसरासह संपूर्ण गणातून उमेदवारीला उत्स्फूर्त प्रतिसाद
अमळनेर :- आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाचे वेध अनेकांना लागले असून त्यामुळे इच्छुक उमेदवार समोर येत आहे. तालुक्यातील कळमसरे पंचायत समिती गणात संगीता दिलीप पवार या इच्छुक उमेदवार म्हणून पुढे आल्या असून स्थानिक महिलांसह युवक वर्गाकडून त्यांना पाठिंबा मिळू लागला आहे.

मारवड येथील संगीता पवार ह्या प्राथमिक शिक्षक दिलीप छगन पवार यांच्या धर्मपत्नी असून कळमसरे गण एसटी राखीव झाल्याने त्यांनी आपली उमेदवारी जाहीर केली आहे.
कळमसरे, मारवड आणि परिसरातील अनेक नागरिकांनी पंचायत समिती स्तरावर विकासाला गती देणारे, सोडून दिलेल्या प्रश्नांवर कार्यक्षमतेने उपाययोजना करणारे नेतृत्व आवश्यक असल्याची भावना व्यक्त केली असून या पार्श्वभूमीवर संगीता दिलीप पवार यांचे नाव पुढे येणे महत्त्वाचे मानले जात आहे. त्यांच्या शांत व सुस्वभावी कार्यपद्धती, सर्वसामान्य कुटुंबाची पार्श्वभूमी या घटकांमुळे त्यांना गणातून पसंती मिळू शकते. अनेकांनी त्यांच्या नेतृत्वाखाली गावातील अपूर्ण प्रश्नांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. दरम्यान, पवार यांच्या समर्थकांनी त्यांची भूमिका मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी तयारी सुरू केली आहे.




