
अमळनेर: पोलिसांच्या तावडीतून पळून गेलेल्या दोन्ही आरोपींना अटक करण्यात अमळनेर पोलिसांना यश आले आहे.

अमळनेर पोलिसांनी शहर व परिसरातून २४ मोटारसायकली चोरणारे हिंम्मत रेहंज्या पावरा वय ३२ व अबीलाल उर्फ अंबादास बुरड्या खर्डे वय २७ रा सातपिंप्री ता शहादा जिल्हा नंदुरबार याना अटक केली होती. या आरोपींची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना न्यायालयाने २८ पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. जळगाव कारागृहात जागा नसल्याने आरोपीना नंदुरबार जिल्हा कारागृहात जमा करण्याचे आदेश दिले होते. या आरोपीना नंदुरबार येथे नेण्यासाठी अमोल पंडित करडयीकर व यशकुमार रवींद्र सपकाळे या दोघा पोलिसांना वॉरंट देण्यात आले. आरोपीना शासकीय वाहनातून नंदुरबार नेत असताना धावडे गावाच्या पुढे अंबालाल ने मला कसे तरी होतेय म्हणून नाटक केले आणि डोळे बंद केले. पोलिसांनी हॉटेल नयन समोरील चहाच्या टपरीवर गाडी थांबवून सपकाळे याने खाली उतरून पाण्याची बाटली आणली. अंबालाल च्या डोळ्यावर पाणी मारले तरी तो डोळे उघडत नव्हता म्हणून अमोल करडईकर याने हाताची बेडी उघडून त्याला पाणी पाजायला सुरुवात केली. त्याचवेळी शेजारी बसलेला हिम्मत पावरा हा बेडीसह पळू लागला. त्याला पकडण्यासाठी पोलीस अमोल पलीकडे धावला तोपर्यंत इकडे आजारी चे नाटक करणारा अंबालाल देखील झटका मारून पळू लागला. सपकाळे त्याला पकडायला धावला त्याने त्यालाही झटका मारला व शेतात पळून गेला. इकडे हिम्मत पावरा रस्त्याच्या पलीकडे धावत असतांना त्याला अमोल ने पकडण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने दोनदा अमोल च्या हाताला झटके मारून निसटून गेला आणि शेतांमध्ये पळून गेला.
पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी हेडकॉन्स्टेबल विनोद सोनवणे ,सुनील तेली ,भूषण परदेशी , अमोल कर्डईकर , मयूर पाटील याना तांत्रिक माहिती पुरवत आरोपींच्या शोधासाठी पाठवले. पोलीस पथक तीन दिवसांपासून जंगलात आरोपींचा शोध घेत होते. अंबिलाल च्या नातेवाईकांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. अंबिलाल बुरड्या खरडे त्याच्या बहिणीकडे रंजाणे गावात असल्याची माहिती मिळताच भल्या पहाटे पोलीस रवाना झाले आणि अंबिलालला अटक केली.
दरम्यान दुसरा आरोपी हिंमत रेहंज्या पावरा हा शिंदखेडा तालुक्यातील विरदेल येथे एक हॉटेल वर असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्यालाही तेथून अटक केली आहे.




