
अमळनेर – कळमसरे पंचायत समिती गणातील आगामी निवडणुकीत गोवर्धन येथील हिराबाई किशोर भिल या इच्छुक उमेदवार म्हणून पुढे आल्या असून स्थानिक पातळीवर त्यांच्या नावाला वेगवेगळ्या समाजघटकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळू लागला आहे.

हिराबाई भिल या सर्वसामान्य कुटुंबातील, साध्या स्वभावाच्या तसेच ग्रामविकासाबाबत जागरूक असलेल्या महिलांपैकी एक आहेत. त्यामुळे परिसरातील महिलांमध्ये त्यांची लोकप्रियता चांगली असून त्यांना पाठिंबा वाढताना दिसत आहे. त्यांच्या उमेदवारीतील एक महत्त्वाचा आधार म्हणजे त्यांच्या पतींचा अनुभव असून पती किशोर गजमल भिल हे गोवर्धन ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच होते. त्यांनी आपल्या कार्यकाळात अनेक विकासकामे राबवली आहेत. स्थानिक प्रशासन आणि जनसंपर्क यात त्यांचा चांगला अनुभव असल्याने हिराबाई भिल यांच्या कार्याला निश्चितच बळ मिळेल, असे ग्रामस्थांचे मत आहे.
शेतकरी, कामगार, महिलावर्ग आणि युवकांच्या विविध प्रश्नांसाठी कार्य करण्याची तयारी हिराबाई यांनी दाखवली असून “विकास आणि सर्वसमावेशकता” हा त्यांचा मुख्य धागा असणार आहे.
कळमसरे पंचायत समिती गणातील स्पर्धा यंदा चुरशीची होणार असली तरी हिराबाई भिल यांच्या उमेदवारीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




