
अपक्ष उमेदवार संजय पाटील यांनी पाठिंबा जाहीर करत घेतली माघार
अमळनेर : नगरपरिषद निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापत असताना प्रभाग क्रमांक १५ मध्ये निवडणुकीचे समीकरण मोठ्या वेगाने बदलत आहेत. स्थानिक समस्यांची जाण, सर्वसामान्य कुटुंबातील पार्श्वभूमी आणि सातत्याने केलेले सामाजिक कार्य या बळावर प्रभाग १५ अ मधील मतदारांकडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरदचंद्र पवार गट) उमेदवार प्रशांत निकम यांना मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला आहे.

मतदारांशी सतत संवाद ठेवत, प्रभागातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, महिलांच्या सुरक्षेचे प्रश्न तसेच तरुणांसाठी रोजगाराभिमुख उपक्रम याबाबत निकम यांनी मांडलेल्या योजनांना नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्या प्रचारादरम्यान होत असलेली गर्दी, घराघरातील भेटींना मिळणारा पाठिंबा आणि स्थानिक वरिष्ठ नागरिकांसह युवक वर्गाचे वाढते आकर्षण हे निवडणुकीत त्यांचे बळ असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान प्रभागातील अपक्ष उमेदवार संजय उत्तम पाटील यांनी निकम यांना आपला जाहीर पाठिंबा देत निवडणुकीतून माघार घेतली. “प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम, कार्यक्षम आणि जनतेत मिसळून काम करणारा प्रतिनिधी हवा. प्रशांत निकम यांचे काम आणि त्यांची बांधिलकी पाहता त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला,” अशी भावना संजय पाटील यांनी व्यक्त केली. नागरिकांनीही हा निर्णय स्वागतार्ह असल्याचे प्रतिपादन करत निकम यांच्या विजयाची शक्यता अधिक बळकट झाली असल्याचे बोलले जात आहे. निवडणूक प्रचाराच्या अंतिम टप्प्यात प्रभाग क्रमांक १५ मध्ये प्रशांत निकम यांच्याभोवती एकहाती वातावरण तयार होत असल्याचे राजकीय वर्तुळातील चर्चा सांगत आहेत.




