
माघारी अंती चित्र स्पष्ट,नगराध्यक्ष पदासाठी 6 तर सदस्य पदासाठी 124 उमेदवार रिंगणात
एक उमेदवार न्यायालयात अंतिम यादी २६ रोजी प्रसिद्ध होणार
अमळनेर:-येथील पालिका निवडणुक रिंगणातून माघारीच्या अखेरच्या दिवशी अनेक उमेदवारांची एक्झिट झाली असून माघारी अंती चित्र स्पष्ट झाल्याने नगराध्यक्ष पदासाठी 6 तर सदस्य पदासाठी 124 उमेदवार रिंगणात आहेत.

दरम्यान अमळनेर पालिका निवडणुकीसंदर्भात उमेदवार इंदिरा प्रविण पाटील यांनी न्यायालयात धाव घेतल्याने निवडणूक प्रक्रियेबाबत चर्चा रंगली आहे.तर उमेदवारांची अंतिम यादी २६ रोजी प्रसिद्ध होणार आहे. अमळनेर पालिकेत 18 प्रभागातून 36 उमेदवार निवडून द्यावयाचे असून त्यापैकी प्रभाग 8 मधून सचिन पाटील बिनविरोध झाले आहेत.तर नगराध्यक्ष पदासाठी 15 पैकी 9 जणांनी माघार घेतल्याने 6 उमेदवार रिंगणात उरले आहेत.यात
जितेंद्र ठाकूर (अमळनेर तालुका व शहर विकास आघाडी),डॉ.परिक्षीत बाविस्कर (शिवसेना),राधाबाई पवार (शिवसेना उबाठा),सखुबाई भिल (अपक्ष),उमाकांत ठाकूर (अपक्ष),अमोल भिल (अपक्ष) आदींचा समावेश आहे.
तसेच नगरसेवकपदासाठी
१९१ जण होते त्यात ६२ जणांनी माघार घेतल्याने १२४ रिंगणात आहेत.
दरम्यान १९६६ च्या नगरपालिका निवडणूक नियमांनुसार दिनांक १८ रोजी वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.त्यानंतर १९ ते २१ या कालावधीत माघार घेतलेल्या उमेदवारांची स्वतंत्र यादीही जाहीर करण्यात आली आहे. आता निवडणूक रिंगणात प्रत्यक्ष लढणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी दिनांक २६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली आहे. न्यायालयीन प्रक्रियेचा निवडणुकीच्या पुढील टप्प्यांवर काय परिणाम होतो याकडे नागरिकांचे लक्ष लागले असून, अंतिम उमेदवार यादी जाहीर झाल्यानंतर व चिन्ह वाटप झाल्यानंतर प्रचाराला वेग येणार आहे.




