
निवडणूक शांततेत आणि कायदा व सुव्यवस्था राखून पार पडावी म्हणून सक्त ताकीद देऊन सोडले…
अमळनेर : भल्या पहाटे अमळनेर पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन राबवून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या २७ जणांना घरातून उचलून पोलीस स्टेशनला आणले. सक्त ताकीद देऊन त्यांना सोडण्यात आले.

नगरपरिषद निवडणूक शांततेत आणि कायदा व सुव्यवस्था राखून पार पडावी म्हणून डीवायएसपी विनायक कोते , पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम , एपीआय रवींद्र पिंगळे , पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ , पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड , पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज यांच्यासह ३५ पोलीसांचे पाच पथक निर्माण करण्यात आले.
शारीरिक दुखापती करणारे ,चोरी ,मालमत्ता आणि अवैध व्यवसाय असे दोनपेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींच्या घरी पहाटे चार ते सहा वाजे दरम्यान कोंबिंग ऑपरेशन राबवले. सर्वांना उचलून पोलीस स्टेशनमध्ये आणले. डीवायएसपी विनायक कोते आणि पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी त्यांना त्यांच्यावरील गुन्ह्यांची जाणीव करून देत आगामी निवडणुकांमध्ये कोणत्याही प्रकारचे गैरकृत्य करू नये अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल अशी ताकीद दिली. काही वेळानंतर सर्वांना सोडून देण्यात आले.
त्याचप्रमाणे न्यायालयातील तारखांना सतत गैरहजर राहणाऱ्या चार जणांना पकडून आणण्याचे वॉरंट काढण्यात आले होते. त्यांनाही पोलिसांनी पकडले होते. त्यातील म्हाडा कॉलनीतील राज वसंत चव्हाण आणि माळीवाड्यातील सतीश राजेंद्र पाटील यांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. तर दोघांनी वॉरंट रद्द केल्याची पावती दाखवल्याने त्यांना सोडून देण्यात आले.




