
अमळनेर :- नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये ‘होम व्होटिंग’ सुविधेमुळे तालुक्यातील अनेक ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांना घरबसल्या मतदानाची संधी मिळाली होती. तालुक्यातील ८५+ वयोगटातील व दिव्यांग असे एकूण ११६ मतदार, तर अमळनेर शहरातील ४५ दिव्यांग आणि ८५+ वयोगटातील मतदार या सुविधेचा लाभ घेऊ शकले होते.
परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ही सुविधा उपलब्ध नसल्याने अनेक वृद्ध आणि दिव्यांग मतदारांत नाराजी व्यक्त केली जात आहे.
मतदानाची इच्छा आहे; पण शरीर साथ देत नाही
अंथरुणाला खिळलेले, चालण्यास अक्षम तसेच दीर्घ आजारांनी त्रस्त असलेले अनेक मतदार मतदान केंद्रापर्यंत पोहोचू शकत नाहीत. त्यांच्यासाठी ‘होम व्होटिंग’ ही सोय अत्यंत महत्त्वाची असल्याचे नागरिक सांगत आहेत.
प्रतिक्रिया….
“लोकसभा व विधानसभा निवडणुकीत अधिकारी थेट घरी आले. मतदानपत्र दिले आणि प्रक्रिया काही मिनिटांत पूर्ण झाली. पण आता तीच सुविधा बंद असल्याने मतदान केंद्रावर जाणे शक्य नाही. मतदानाचा हक्क बजावता येणार नाही याची खंत आहे.”
– कुणाल ईश्वर महाजन
दिव्यांग मतदार, अमळनेर
प्रतिक्रिया….
“मतदान हा प्रत्येकाचा मूलभूत हक्क आहे. दिव्यांग व वृद्ध मतदारांना सोयीशिवाय मतदान केंद्रावर बोलावणे योग्य नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही होम व्होटिंग सुरू करणे ही काळाची गरज आहे.
कृष्णा पाटील
जेष्ठ नागरिक
प्रतिक्रिया
“लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी केंद्रीकृत पातळीवर होम व्होटिंगची तरतूद आहे. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी अद्याप राज्य स्तरावरील नियमावलीत ती सुविधा उपलब्ध नाही. परंतु दिव्यांग व जेष्ठ मतदारांसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर व्हील चेअर ची व्यवस्था करण्यात आली आहे शिवाय रॅम्प, बनवण्यात आहे त्यांना सहकार्य करण्यासाठी सहकारी देण्यात येणार आहे.तसेच त्यांना आधी मतदानासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे ” – गणेश शिंदे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी, अमळनेर नगरपरिषद




