
अमळनेर:- २० रोजी तालुक्यातून वेगवेगळ्या ठिकाणाहून २६ वर्षीय विवाहिता व दोन तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार नातलगांनी पोलिसात दाखल केली आहे.

मूडी प्र. डां. येथील २६ वर्षीय विवाहिता २० रोजी सोनगीर येथे डॉक्टरकडे जाऊन येते असे सांगून सकाळी १० वाजता घरून निघाली. मात्र संध्याकाळ पर्यंत ती परत न आल्याने पतीने नातेवाईक व आजुबाजूच्या परिसरात शोध घेतला. मात्र काहीच तपास न लागल्याने पतीने मारवड पोलिसांत तक्रार दाखल केली असून पुढील तपास सफौ सुनील पाटील हे करीत आहेत.
शहरातील रतनदादा नगर भागात राहणारी १८ वर्षीय तरुणी २० रोजी सकाळी १० वाजता कॉलेजला जाऊन येते असे सांगून घरातून बाहेर पडली. मात्र दुपार झाली तरी ती घरी न परतल्याने तिच्या वडिलांनी व भावांनी कॉलेजला जाऊन तपास केला असता ती कॉलेजला आली होती मात्र एका वाजता ती तेथून निघाली. मात्र उशिरापर्यंत घरी न आल्याने व नातेवाईकांकडे ही तपास न लागल्याने तिच्या वडिलांनी अमळनेर पोलिसांत तक्रार दाखल केली असून पुढील तपास हेकॉ विनोद सोनवणे करीत आहेत.
२० रोजी कन्हेरे येथील २१ वर्षीय तरुणीला ब्युटी पार्लरच्या क्लासला जाण्यासाठी तिच्या वडिलांनी तिला सकाळी ९ वाजता फाफोरे बस स्टँडवर सोडले. दुपारी तिला फोन केला असता तिचा फोन बंद असल्याचे समजल्याने वडिलांनी क्लासच्या ठिकाणी जाऊन तपास केला असता ती मिळून आली नाही. शहरात इतरत्र ही तिचा तपास न लागल्याने तिच्या वडिलांनी अमळनेर पोलीस ठाणे गाठत बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली असून पुढील तपास हेकॉ काशीनाथ पाटील हे करीत आहेत.




