
अमळनेर : उमेदवारच्या नावाने पालिका कर्मचाऱ्यांविरुद्ध आचारसंहिता भंगाची बनावट तक्रार देण्याचा प्रकार उमेदवारनेच उघडकीस आणला आहे.

अमळनेर पालिकेतील सफाई कर्मचारी दिनेश संदानशीव आणि घंटा गाडीवरील कंत्राटी कर्मचारी रमेश झालटे यांच्याविरुद्ध उमेदवार शेख आयशाबी शेख अल्ताफ यांच्या नावाने आचारसंहिता भंगाची तक्रार करण्यात आली होती. हे सरकारी कर्मचारी असून एका उमेदवाराचा प्रचार करीत आहेत असे नगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडे प्राप्त तक्रारीत म्हटले होते. याची गांभीर्याने दखल घेत आरोग्य निरीक्षक किरण कंडारे यांनी सफाई कर्मचाऱ्याला कारणेदाखवा नोटीस दिली आणि त्याची प्रत तक्रारदाराला पाठवण्यात आली. संबंधित कर्मचाऱ्याने असा कोणताही प्रकार झाला नसल्याचे स्पष्ट केले. तिकडे शेख आयशाबी यांना माहितीसाठी मिळालेली प्रत पाहतच आश्चर्यचकित झाल्या. त्यांनी तातडीने आरोग्य विभागाशी संपर्क साधला तथा पालिकेच्या मुख्याधिकारीना देखील समोर येऊन स्पष्टीकरण दिले. त्यामुळे सत्य प्रकार उघडकीस येऊन कर्मचाऱ्यावरील कारवाई टळली आहे. दरम्यान त्या महिलेने खोट्या तक्रारदाराचा शोध घेऊन कारवाईची मागणी केली आहे.




