
प्रभाग १ मधील उमेदवार इंदिरा पाटील यांची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांविरुद्ध न्यायालयात धाव
अमळनेर : उमेदवारी अर्जाची प्राथमिक तपासणी न करता आणि त्रुटी निदर्शनास न आणून देता दुरुस्तीची संधी दिली नाही आणि उमेदवारी अर्ज नाकारल्याने अमळनेर शहरातील प्रभाग १ मधील उमेदवार इंदिरा प्रवीण पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांविरुद्ध न्यायालयात धाव घेतली आहे.

तांबेपुरा येथील इंदिरा प्रवीण पाटील यांनी १७ रोजी अखेरच्या दिवशी २:३० वाजता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पालिकेत हजर होत्या. उमेदवारी अर्जाची प्राथमिक तपासणीची संधी मिळाली नाही , निवडणूक आयोगाच्या १ एप्रिल २०१७ च्या तरतूद क्रमांक ४(१) मध्ये स्पष्ट नमूद आहे की उमेदवाराने सादर केलेल्या नामनिर्देशनपत्राची प्राथमिक तपासणी करणे आवश्यक आहे. त्रुटी आढळल्यास उमेदवारास कळवून दुरुस्तीची संधी देणे बंधनकारक आहे. उमेदवार सूचक अनुमोदक यांच्या स्वाक्षरीशिवाय राहिल्यास किंवा कागदपत्रात त्रुटी राहिल्यास दुरुस्तीची संधी देणे आवश्यक असताना असे न करता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नामनिर्देशन नाकारले आहे. त्यामुळे माझ्या नैसर्गिक न्यायाधिकाराचा भंग झाला आहे. लोकशाही प्रदान देशात माझ्या उमेदवारीवर गदा येत आहे. त्यामुळे माझा नामनिर्देशन अर्ज वैध प्रक्रियेनुसार स्वीकारण्यात यावा आणि मला न्याय मिळावा अशी मागणी इंदिरा पाटील यांनी न्यायालयाकडे केली आहे.
या अर्जावर न्यायालयात २४ रोजी सुनावणी होणार आहे. न्यायालय काय निर्णय देते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.




