
माजी आमदारांच्या दुपट्टी भूमिकेवर अनेकांकडून सवाल…
अमळनेर:- अमळनेर नगरपरिषद निवडणूक चांगलीच रंगात आली असताना शहर विकास आघाडी व शिंदे सेनेकडून एकमेकांवर आरोपांच्या फैरी झडत आहेत. यात मात्र माजी आमदार चौधरी यांच्या दुपट्टी भूमिकेवर अनेकांकडून सवाल केले जात आहेत.

शहर विकास आघाडीकडून नगराध्यक्ष पदासाठी आमदार अनिल पाटील, खासदार स्मिता वाघ, साहेबराव पाटील व माजी नगराध्यक्ष जयश्री पाटील यांनी सडेतोड व्यक्तिमत्व, मित्रांचा मोठा गोतावळा असणारे जितेंद्र ठाकूर यांना उमेदवारी दिली. जितेंद्र ठाकूर यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसून केवळ स्वबळावर त्यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. आजपावतो पत्रकारिता क्षेत्रात कार्य करीत असताना त्यांनी अनेकांना न्याय मिळवून दिला. अनेकांच्या कार्याचे कौतुक केले, तर चुकले त्यावेळी कडक ताशेरे ओढण्यास ही मागे पुढे पाहिले नाही. त्यावेळी त्यांनी कोणत्याही परिणामांची चिंता न करता अनेक गैरप्रकारांना आळा लावत समाज हिताला प्रथम प्राधान्य दिले. अनेकवेळा आजी माजी आमदारांच्या चांगल्या कार्याचे कौतुकही केले. आता राजकीय रिंगणात नशीब आजमावत असताना माजी आमदार चौधरीना साक्षात्कार झाला असून आपलाच उमेदवार कसा निष्कलंक आहे याची खात्री पटावी म्हणून समोरच्या उमेदवाराला बदनाम करायचे षडयंत्र रचले आहे. मात्र दुसऱ्याकडे एक बोट दाखवत असताना चार बोट आपल्याकडे आहेत हे माजी आमदारांनी विसरू नये. “माजी आमदार दादानी का खंडीभर वावरे करी इतला पैसा कमावात का ?” असा सवाल जनता विचारत आहे. पत्रकार आपल्या सकारात्मक बातम्या लावतो तेव्हा चांगला आणि विरोधात असला की लचके तोडणारा असे म्हणून माजी आमदारांनी अनेक पत्रकारांचा ही रोष ओढवून घेतला आहे. या वक्तव्याचा परिणाम येत्या काळात दिसेल असे बोलले जात आहे.




