
अमळनेर : अमळनेर आगारातील वाहक दैवत पाटील व चालक जितेंद्र चव्हाण हे 5:40 मिनिटांची पुणे ड्युटी करत असताना येताना बसमध्ये संशयास्पद अज्ञात बॅग आढळली. तात्काळ परिस्थितीची कल्पना घेऊन त्यांनी बॅग उघडून पडताळणी केली असता त्यामध्ये अमूल्य सामान व तब्बल ₹13,000/- रोख रक्कम असल्याचे निदर्शनास आले.

दोन्ही कर्मचारी यांनी कुठलाही मोह न बाळगता स्थानिक आगारात संपर्क साधून संबंधित प्रवाशाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र कुठलेही ठोस धागेदोरे न मिळाल्याने सदर बॅग व सर्व सामान विनाअट आगार प्रशासनाकडे जमा केले.
याबद्दल जळगाव विभागाचे विभाग नियंत्रक बंजारा यांनी आज अमळनेर आगाराला भेट देऊन दोन्ही प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन विशेष सत्कार केला.
सत्कार प्रसंगी जळगाव विभाग नियंत्रक दिलीप बंजारा म्हणाले की “आर्थिक प्रलोभनाला न झुकता समाजापुढे आदर्श ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळेच महामंडळाची विश्वासार्हता वाढते. दैवत पाटील व जितेंद्र चव्हाण यांचा प्रामाणिकपणा इतरांसाठी प्रेरणादायी आहे.”
या प्रसंगी आगार प्रमुख प्रमोद चौधरी कामगार अधिकारी कमलेश भावसार,मुकेश सैंदाणे, सतीश सातपुते कर्मचारी व इतर मान्यवर उपस्थित होते.अमळनेर आगारातून अशा कर्मचाऱ्यांमुळे समाजात प्रामाणिकतेचा संदेश पोहोचत असून सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.




