
पाच बैठे पथक नेमत नदी काठावरील रस्ते खोदून अवैध गौण खनिज वाहतुकीला घातला आळा…
अमळनेर : नूतन प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांनी पदभार स्वीकारताच अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. बैठे पथक नेमून नदी काठावरील रस्ते खोदून अवैध गौण खनिज वाहतुकीला आळा घातला आहे.

मयूर भंगाळे यांनी पदभार घेताच काही लोकांनी अवैध वाळू वाहतुकीच्या तक्रारी केल्या होत्या. भंगाळे यांनी प्राप्त तक्रारीनुसार वाळू चोरण्याच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी केली. जळोद येथील तापी नदीच्या पुलाखाली १०० मीटर च्या आत मोठ्या प्रमाणावर वाळू वाहतुक चोरी झाल्याचे दिसून आले. मोठे खड्डे नदी पात्रात दिसून आले. पुलाला धोका निर्माण झाला म्हणून गांभीर्याने दखल घेऊन प्रांताधिकारी भंगाळे यांनी पोलीस पाटील ,कोतवाल, ग्राम महसूल अधिकारी आदिना वाळू चोरीवर नियंत्रण मिळवण्याच्या सूचना दिल्या.
अमळनेर व चोपडा तालुक्यात अवैध वाळू वाहतूक होत होती म्हणून जेसीबी मशीनच्या साह्यायाने नदी पात्रकडे जाणारा रस्ता खोदून काढला. जेणेकरून वाळू चोरणारी लहान मोठी वाहने जाऊ शकत नाहीत.
तालुक्यातील सर्व ग्राम महसूल अधिकाऱ्यांची सकाळ आणि रात्र अशा दोन पाळ्या करून विविध पथके नेमण्यात आली आहेत. एका पथकात मंडळ अधिकारी महसूल अधिकारी आणि पोलीस पाटील अशा सहा कर्मचाऱ्यांच्या समावेश आहे. आठवड्यातील कोणत्या वारी कोणते कर्मचारी कोठे थांबतील याचे वेळापत्रक नेमून दिले आहे.
याठिकाणी नेमले पथक
पथक क्रमांक १ बोरी नदी काठी, अमळनेर , फापोरे , अंतुर्ली , हिंगोणे , तासखेडा ,बहादरवाडी ,करणखेडे ,फापोरे
पथक क्रमांक २ पांझरा नदी काठी मांडळ , मुडी ,कलंबू ,भिलाली व परिसर
पथक क्रमांक ३ पांझरा नदी परिसरात शहापूर ,तांदळी ,खेडी खर्दे ,वासरे कळमसरे व परिसर
पथक क्रमांक ४ तापी नदी परिसर हिंगोणे , दोधवद , जळोद , निंभोरा ,अमळगाव व परिसर
पथक क्रमांक ५ पातोंडा ,मठगव्हान ,धावडे,सावखेडा ,खापरखेडे प्र अ ,कामतवाडी,धुरखेडा आदी ठिकाणी पथके नेमण्यात आली आहेत.
प्रतिक्रिया…
पथकाना दर दोन तासाला व्हॉट्सअँप ग्रुपवर फोटोसह अहवाल पाठवायला सांगितला आहे. तसेच अवैध वाळू साठ्यांवर देखील पंचनामे करून कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यांनी अहवाल न पाठविल्यास कर्मचारी गैरहजर गृहोत धरून त्याच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा कायदा १९७९ प्रमाणे कारवाई करण्यात येईल.- मयूर भंगाळे, उपविभागीय अधिकारी अमळनेर




