
अमळनेर : नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५चा उलट काऊंटडाऊन सुरू असताना सर्वात महत्त्वाची पायरी म्हणून EVM (कंट्रोल युनिट व बॅलेट युनिट) सिलींग प्रक्रिया दिनांक २९ नोव्हेंबर रोजी इंदिरा गांधी भवन येथे अत्यंत काटेकोर व पारदर्शक पद्धतीने पार पडली.

सकाळी ९ वाजता प्रक्रिया सुरू झाली. यावेळी ९७ मतदान केंद्रांसाठी लागणाऱ्या सर्व EVM युनिटची तपासणी करण्यात आली. प्रत्येक मशीनचा तांत्रिक दर्जा, क्रमांक, ओळख पट्टी यांची नोंद घेऊन अधिकृत सील लावण्यात आली. त्यानंतर सर्व युनिट्स सुरक्षा व्यवस्थेसह स्ट्रॉंग रूममध्ये सुरक्षितरीत्या ठेवण्यात आली. यावेळी उमेदवार व त्यांचे प्रतिनिधीही उपस्थित असल्याने संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडली.
१८ प्रभाग — ३६ वार्ड — ९७ मतदान केंद्रे या निवडणुकीतअसून मोठ्या प्रमाणावर मतदान होणार असल्याने कोणत्याही तांत्रिक अडचणीचा फटका मतदारांना बसू नये यासाठी अतिरिक्त राखीव कंट्रोल युनिट व बॅलेट युनिटही प्रशासनाने उपलब्ध ठेवली आहेत. तसेच आकस्मिक परिस्थितीत त्वरित कारवाई करता यावी यासाठी स्वतंत्र तांत्रिक रिलीफ टीम सज्ज ठेवण्यात आली आहे. यापूर्वी सर्व मतदान कर्मचाऱ्यांना संपूर्ण प्रशिक्षण देण्यात आले असून यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी निवृत्ती गायकवाड म्हणाले,
“मतदान प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी सर्व तांत्रिक आणि प्रशासकीय तयारी केली आहे. निवडणूक प्रामाणिक, सुरक्षित आणि पारदर्शक होणे हीच आमची प्राथमिकता आहे.”अमळनेरमध्ये निवडणूक तयारी आता वेगाने अंतिम टप्प्यात पोहोचली असून प्रशासन सज्ज झाले आहे.




