
अमळनेर:- तालुक्यातील कळमसरे येथे शेत रस्त्यावरून वाद झाल्याने शिवीगाळ करत दगड मारून महिलेचे डोके फोडल्याने दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी शीतल प्रदीप महाजन (वय ३६) रा. कळमसरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ४ रोजी त्या सासू व जेठाणीसोबत शेतात गेल्या होत्या. शेतात पेरणी साठी बोलवलेले ट्रॅक्टर येत असताना फिर्यादी महिला रस्त्यात टाकलेले काटे उचलून घेत होती. त्यावेळी बाजूला शेत असलेले तुळशीराम त्र्यंबक महाजन व सरलाबाई तुळशीराम महाजन हे त्याठिकाणी आले व काटे का उचलत आहे ? इकडून ट्रॅक्टर जाऊ देणार नाही असे म्हणत शिवीगाळ सुरू केली. फिर्यादी महिलेने शिवीगाळ करू नका असे म्हटल्याचा राग आल्याने तुळशीराम महाजन याने कपाळावर दगड मारून फिर्यादी महिलेचे डोके फोडत इथेच गाडून टाकू अशी धमकी दिली. त्यावरून दोघा पती पत्नीविरुद्ध मारवड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सफौ संजय पाटील करीत आहेत.



