
न्यायालयात हजर केले असता सुनावली पाच दिवसांची पोलिस कोठडी,,
अमळनेर : तालुक्यातील मांडळ येथे वाळू माफियांनी महसूल कर्मचाऱ्यांना गावठी कट्टा लावून वाहने पळवून नेल्या प्रकरणी डीवायएसपी विनायक कोते यांनी गांभीर्याने दखल घेत मारवड पोलिसांनी तीन आरोपी आणि दोन्ही ट्रॅक्टर जेरबंद केले आहेत.
मांडळ येथे सातत्याने दुसऱ्यांदा वाळू चोरांनी महसूल कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याने तालुक्यात खळबळ माजली होती. दहा ते बारा जणांनी महसूल पथकाला स्प्रे मारून आणि गावठी कट्टा लावून आपली वाहने पळवून नेली. वाळू चोरांवर पोलिसांचा धाक नसल्याचा आरोप होऊ लागला होता. म्हणून उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे, डीवायएसपी विनायक कोते यांनी गंभीरपणे लक्ष घालून त्यांचे पथक , एलसीबी पथक आणि मारवड पोलीस स्टेशनचे पथक कामाला लावले होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक जीभाऊ पाटील , पोलीस उपनिरीक्षक विनोद पवार , सहाय्यक उपनिरीक्षक फिरोज बागवान , हेडकॉन्स्टेबल संजय पाटील यांनी सागर अशोक कोळी (वय २७) रा. नरडाणा याला पारोळा येथून अटक केली. तर किरण संजय कोळी (वय २६ रा मांडळ) याला मांडळ येथून अटक केली आहे. तर एलसीबी चे संदीप पाटील आणि प्रवीण मांडोळे यांनी जेसीबी मालक विकास अशोक पाटील याला धुळे जिल्ह्यातील नेर येथून अटक केली आहे. आरोपींकडिल दोन्ही ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहेत.
सागर कोळी याला सर्वोच्च न्यायालयाने गावात बंदी घातली आहे. इतर आरोपींच्या शोधासाठी सुनील आगोने, धनंजय देसले, मिलिंद बोरसे प्रयत्न करीत आहेत.तिंन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कस्टडी न्यायाधीश निलेश .र. येलमाने यांनी सुनावली.




