
अमळनेर : महसूल पथकाला गावठी कट्टा लावणाऱ्या मांडळ येथील सर्व आरोपींना जोपर्यंत शस्रसह अटक होत नाही तोपर्यंत महसूल कर्मचाऱ्यांनी निवडणूक व नैसर्गिक आपत्तीचे कामकाज वगळून सर्व काम बंद ठेवण्याचा इशारा महसूल कर्मचाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे याना दिले आहे.
७ रोजी पहाटे १ वाजता महसूल पथकाने मांडळ शिवारात पांझरा नदीत जेसीबी ,ट्रॅक्टर पकडण्याचा प्रयत्न केला असताना चार पाच जण मोटरसायकलवर आले आणि दहा बारा जण लाठ्या काठ्या घेऊन आले होते. त्यातील एकाने ग्राम महसूल अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या डोळ्यात स्प्रे मारला आणि काठीने मारहाण झाली. तर मंडळाधिकारी पी एस पाटील यांच्या कपाळाला गावठी कट्टा लावला होता. मारवड पोलीस स्टेशनला एकाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी आरोपींवर जीवे मारण्याचा प्रयत्न करणे कलम १०९ व कलम ३०९ प्रमाणे गुन्हा दाखल करावा तसेच त्यांच्यावर एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
निवेदन देताना संघटनेचे अध्यक्ष पुरुषोत्तम पाटील , चिटणीस मुकेश देसले , उपाध्यक्ष मधुकर पाटील , कार्याध्यक्ष योगेश पाटील , जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पवार ,विभागीय उपाध्यक्ष भूषण पाटील , जिल्हा प्रतिनिधी प्रवीण कंखरे , विठ्ठल पाटील , रवींद्र बेलदार, प्रमोद माळी , पवन शिंगारे , गीता बडगुजर , द्रौपदी पजई, अदिती जरे , शीतल पाटील हजर होते.
एकंदरीत वाळू जोरात तापली असून ग्राम महसूल अधिकारी , मंडळाधिकारी , नायब तहसीलदार , अव्वल कारकून यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन पोलिसांबद्दलही नाराजी व्यक्त केली.




