
अमळनेर:-शहरातील न्यू लक्ष्मी टाकी परिसरात काल सकाळी एक मोठा अपघात थोडक्यात टळला. रस्त्याच्या कडेला असलेल्या भुयारी गटाराच्या चारीत एक भरलेला मालवाहू ट्रक अचानक फसला, त्यामुळे काही वेळ परिसरात प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
सदर ट्रक रस्त्याच्या बाजूने जात असताना अचानक त्याच्या मागील चाकांनी भुयारी गटाराच्या कडेला असलेली चारी खचल्याने ट्रक पूर्णपणे तिरपा होऊन अडकला. ट्रक उलटण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, सुदैवाने मोठा अपघात टळला आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही.दोन जेसीबीच्या मदतीने ट्रक बाहेर काढला
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ मदतीस धाव घेतली. मोठ्या प्रयत्नांनंतर दोन जेसीबीच्या सहाय्याने ट्रक सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आला.या संपूर्ण कारवाईदरम्यान काही काळ रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. ट्रक बाहेर काढल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.यानिमित्ताने रस्त्याच्या निकृष्ट कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.




