
त्वरित खरेदी केंद्र सुरू करण्याची शेतकऱ्यांनी केली मागणी…
अमळनेर : किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत खरीप हंगामाची शासकीय भरड धान्य खरेदीचे आदेश आल्यानन्तर देखील खरेदी सुरू न झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्वरित खरेदी केंद्र सुरू करावे अशी मागणी शेतकऱ्यांतर्फे उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांना करण्यात आली आहे.
मार्केटिंग फेडरेशन चे प्रभारी जिल्हा पणन अधिकारी एस एस मेने यांनी एरंडोल शेतकी संघाला अमळनेरच्या खरेदी केंद्राची परवानगी दिलेली असून भरड धान्य खरेदीची सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. शासकीय खरेदी सुरू होताच खाजगी व्यापारी देखील शेतकऱ्यांच्या मालाला भाव वाढवून देतात.
अमळनेरात अद्यापही भरड धान्य खरेदी सुरू न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. त्वरित भरड धान्य शासकीय खरेदी सुरू करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा कृउबा संचालक प्रा सुभाष पाटील , प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पिरन पाटील , प्रताप पाटील , दिनेश पवार , सुनील पाटील , जी एम पवार ,गिरीश पाटील , पांडुरंग पाटील , जितेंद्र देशमुख यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे , तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्याकडे केली आहे.
त्याचप्रमाणे मागील वर्षाचे खरीप हंगाम २०२४-२५ च्या अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांचे केवायसी होऊनही पैसे जमा होत नाही. तांत्रिक अडथळे दूर होऊनही शेतकऱ्यांचे पैसे तात्काळ जमा करावेत अशीही मागणी करण्यात आली आहे.
भरड धान्य खरेदी केंद्र तात्काळ सुरू करण्यात यावे आणि २०२४-२५ च्या खरीप हंगामाचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ टाकण्याबाबत उचित कार्यवाही करण्यात यावी असे पत्र तहसीलदार आणि एरंडोल शेतकी संघाच्या व्यवस्थापक आणि सचिवाला देण्यात आले आहे- मयूर भंगाळे ,उपविभागीय अधिकारी, अमळनेर
गोदाम उपलब्ध नाही मात्र टाकरखेडा रस्त्यावर नवीन शासकीय गोदाम बांधण्यात आले आहे. त्याची क्षमता तपासून सुरू करून खरेदी केलेला माल तेथे ठेवण्यात येईल.- रुपेशकुमार सुराणा ,तहसीलदार अमळनेर




