
शासनाकडून प्राप्त निधी व खर्चाची माहिती घेत जाणून घेतली कामाची वस्तुस्थिती…
अमळनेर:- निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरणाच्या कामाची पाहणी करण्यासाठी पाडळसरे धरण जनआंदोलन समितीतर्फे प्रत्यक्ष धरणावर भेट देऊन शासनाकडून प्राप्त निधी व खर्चाची माहिती घेत कामाची वस्तुस्थिती संबंधित अधिकाऱ्यांकडून आंदोलनकर्त्यांनी जाणून घेतली.
निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरण नाचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या प्राप्त निधी व केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या निधीच्या संदर्भात धरण समिती लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून पाठपुरावा करीत आहेत त्यासोबतच धरणाच्या बांधकामाची प्रगती आणि वस्तुस्थिती तसेच पुनर्वसन याबाबतची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी जन आंदोलन समितीचे पदाधिकारी यांनी प्रत्यक्ष धरणाला भेट दिली. जन आंदोलन समितीचे प्रमुख सुभाष चौधरी, अर्बन बँक संचालक रणजित शिंदे, महेंद्र बोरसे, महेश पाटील, देविदास देसले प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी धरणाचे काम गतिमानतेने व कालबद्ध पद्धतीने व्हावे तसेच बांधकामातील प्रशासनिक, तांत्रिक,आर्थिक अडचणी काय आहेत याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी धरणाच्या बांधकामावर प्रत्यक्ष चर्चा करून माहिती घेतली.
याप्रसंगी झालेल्या बैठकीत निम्न तापी प्रकल्प कार्यालयाचे कार्यकारी अभियंता य.म.कडलक यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना सविस्तर माहिती देताना सांगितले की धरणाच्या बांधकामाच्या अनेक गोष्टी सोबत करावे लागतात नाहीतर नुसतं पाणी साठलेले डोळ्याने दिसते पण मिळत नाही अशी एक परिस्थिती तयार होते अशी विपरीत परिस्थिती होऊ नये म्हणून आपण एकाचवेळी वेळवेगळ्या पातळ्यांवर ज्या ज्या गोष्टी शक्य आहेत त्या करीत आहोत. आम्ही त्या सगळ्या गोष्टींचा टाइमिंग कसं मॅच होईल ? म्हणजे पाणी साठा होईपर्यंत आपल्याला लोकांना पाणीही देता आले पाहिजे या दृष्टीने काम करतो आहोत. प्रत्यक्ष भूसंपादन, पुनर्वसनासाठी सुद्धा प्रयत्न सुरू आहेत.
धरणाच्या कामात सध्यातरी आपल्याला कुठलीही तांत्रिक अडचण नाही. नदी सहा महिने वाहते त्यामुळे कामाला वेळ कमी मिळतो.तरीही धरण बांधकाम पूर्ण क्षमतेने सुरू आहे.महाराष्ट्रात सर्वाधिक मोठे गेट असलेले धरणापैकी एक पाडळसरे धरण आहे.यात तांत्रिक काम असल्याने त्याला वेळ लागतो.एवढं मोठं काम अत्यंत बारकाईने करायचे आहे.असे यावेळी सांगितले.कामावर स्टाफ खूप कमी आहे .आज ना उद्या आम्हाला स्टाफ मिळत जाईल आमचा एक माणूस तीन माणसांचं काम करतोय.असे सांगत शासनाकडून प्राप्त व खर्च झालेल्या निधीची माहिती ही याप्रसंगी उपअभियंता भटूरकर यांच्या उपस्थितीत समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिली.
याप्रसंगी समितीचे प्रमुख सुभाष चौधरी यांनी सविस्तरपणे समितीची भूमिका मांडली. बैठकीचे सूत्रसंचालन रणजित शिंदे यांनी केले.आभार सुनिल पाटील यांनी मानले. यावेळी भरतसिंग परदेशी, एन के पाटील ,ॲड.कुंदन साळुंखे, डॉ.संजय पवार, रहेमतुल्ला पिंजारी, सुशिल भोईटे, प्रसाद चौधरी, सतिष काटे, डी के पाटील, प्रविण संदानशिव, पुरुषोत्तम शेटे, ज्ञानेश्वर वारुळे, दिनेश पाटील,गुलाब पाटील,
मोहन तिलक, गौतम संदानशिव, रमेश चव्हाण, भगवान कोळी, माधव पाटील,सुपडु बैसाणे, नारायण बडगुजर , संजय सोनवणे आदींसह मोठ्या संख्येने समितीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सकारात्मक भूमिकेसाठी कार्यकारी अभियंता यांनी मानले जन आंदोलन समितीचे आभार…
धरणाच्या कामात प्रशासनाला नेहमीच जनआंदोलन समितीचा विविध टप्प्यांवर सहकार्य लाभले आहे. बऱ्याच ठिकाणी जन आंदोलनं प्रकल्पाच्या विरोधात असतात मात्र असे खूप कमी प्रकल्प आहेत ज्या ठिकाणी समिती ही धरणाच्या समर्थनाच्या भूमिकेत आहेत त्यात पाडळसरे जन आंदोलन समिती सदैव धरणाच्या व काम करणाऱ्या प्रशासनाच्या पाठीशी उभी असते ही फार दुर्मिळ गोष्ट आहे तशी फार सकारात्मक गोष्टी आहे. यासाठी मी शासनाच्यावतीने पाडळसरे धरण जन आंदोलन समितीचे आभार मानतो.असे यावेळी कार्यकारी अभियंता य म कडलक यांनी सांगितले.




