
अमळनेर (प्रतिनिधी) येथील पालिकेच्या उपनगराध्यक्ष पदी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नगरसेवक प्रशांत निकम यांची बिनविरोध निवड झाली.
पालिकेच्या सभागृहात ९ रोजी दुपारी ३ वाजता नगराध्यक्ष तथा पीठासन अधिकारी डॉ.परिक्षीत बाविस्कर यांच्या अध्यक्षतेखाली उपनगराध्यक्ष तसेच स्वीकृत सदस्य निवडीसाठी बैठक आयोजित करण्यात आली होती.
पालिकेच्या ३६ नगरसेवकांपैकी शरद पवार गटाचे प्रशांत निकम यांना शिवसेनेच्या शिंदे गटाचे १६ व ६ अपक्ष अशा २२ जणांचा पाठिंबा होता, तर शहर विकास आघाडीकडे १२ व २ अपक्ष अशा १४ जणांचे पाठबळ होते.शिवसेना शिंदे गटाकडे पूर्ण बहुमत असल्याने अमळनेर शहर विकास आघाडीने देखील यावेळी आपला उमेदवार दिला नसल्याने प्रशांत निकम यांची बिनविरोध निवड पार पडली.मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी यावेळी कामकाज पाहिले.
यावेळी शिवसेना शिंदे गटाकडून माजी नगरसेवक मोहन सातपुते,गुलाब पाटील यांची,अपक्ष नगरसेवकांच्या गटाकडून माजी नगरसेवक प्रताप साळी यांची तर अमळनेर शहर विकास आघाडीकडून मंगळग्रह संस्थानाचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांची स्वीकृत सदस्यपदी निवड करण्यात आली.
यावेळी शिवसेना शिंदे गट तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून जल्लोष करण्यात आला. माजी आमदार डॉ. बी.एस.पाटील, उद्योजक डॉ.रवींद्र चौधरी तसेच समर्थकांची यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
माजी आमदार गटाचे काही नगरसेवक नाराज…
उपनगराध्यक्ष पदावरून मोठे नाराजी नाट्य रंगल्याची माहिती असून इतक्या वर्षापासून निष्ठा टिकवून ठेवल्याचे फळ मिळाल्याचे नाराज नगरसेवकांनी खाजगीत बोलून दाखवले. एका नेत्याने गुड बायचे स्टेटस ठेवत उघडउघड नाराजी दर्शवली असून भविष्यात या नाराज गटाकडून मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.




