
अमळनेर – समाजातील गरजूंपर्यंत सकस अन्न पोहोचावे, कोणताही नागरिक उपाशी राहू नये या सेवाभावी ध्येयाने कार्य करणाऱ्या लायन्स क्लब अमळनेर तर्फे मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नर्मदावाडी येथे अन्नदान शिबीर आयोजित करण्यात आले. “हंगर विक प्रोजेक्ट” अंतर्गत राबविण्यात आला.महिन्यातील दर सोमवारी हे अन्नदान करण्यात येणार आहे.
मकरसंक्रांतीच्या शुभदिनाचे औचित्य साधत गरजू कुटुंबांना गोड पुरणपोळी, आमटी-भात, गोडशिरा, कुरडाई, पापड,अशा पारंपरिक व पौष्टिक जेवणाचे वाटप करण्यात आले. सकाळी ११.४५ वाजता नर्मदावाडी परिसरात हा उपक्रम सुरू करण्यात आला. वितरणासाठी लायन्स क्लबच्या स्वयंसेवकांनी नियोजनबद्ध तयारी केली होती.
उपक्रमाच्या वेळी काठेयावाडी जैन संघाचे अध्यक्ष नितीनकुमार शहा, गिरीष शहा, राजु देसाई, लायन्स डॉ. संदीप जोशी, सचिव महेंद्र पाटील, खजिनदार नितीन विंचूरकर, चेतन जैन, प्रशांत सिंघवी, डॉ. मिलिंद नवसारीकर, एसदि भरुचा, सुनिल चौधरी, दिलीप गांधी, चंद्रकांत महाजन,आदी पदाधिकारी तसेच क्लबचे सर्व सदस्य उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी अन्नदानाच्या माध्यमातून समाजातील दुर्बल घटकांना दिलासा मिळावा हीच खरी संक्रांत असल्याचे मत व्यक्त केले.
लायन्स क्लबने राबविलेल्या या उपक्रमाचे स्थानिकांनी कौतुक केले. “हंगर विक” अंतर्गत पुढील काही दिवसांतही गरजूंना मदत करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जाणार असल्याचे क्लबकडून सांगण्यात आले. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत अन्न, आरोग्य आणि शिक्षणाच्या सुविधा पोहोचविणे हा क्लबचा व्यापक उद्देश असल्याचे लायन्स क्लब अध्यक्ष डॉ. संदीप जोशी यांनी सांगितले.




