
अमळनेर : दोन वाहनांच्या धडकेत एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना विप्रो कंपनीच्या प्रवेशद्वाराजवळ १० रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली.
इस्माईल सिकंदर पिंजारी (वय ६५) हे आपल्या मोटरसायकलवर तांबेपुरातून सुभाष चौकाकडे जात असताना समोरून पुलातून येणाऱ्या वेगवान वाहनाने धडक दिल्याने ते मोटरसायकलवरून खाली पडले. नगरसेवक मुक्तार खाटीक , विजय राजपूत यांच्यासह आजूबाजूच्या नागरिकांनी त्यांना उपचारासाठी नर्मदा फाउंडेशन मध्ये दाखल करण्यासाठी मदत केली. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. त्यांचे शव विच्छेदनसाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. रात्री उशिरापर्यंत पोलीस कारवाई सुरू होती.
दरम्यान १०८ रुग्णवाहिकेला फोन केल्यावर रुग्णवाहिका आली परंतु पुलाची उंची कमी असल्याने रुग्णवाहिका घटनास्थळापर्यंत पोहचू शकली नाही. तांबेपुरा वासीयांसाठी ही कायमची समस्या निर्माण झाली आहे. मोठी वाहने या रस्त्याने जाऊ शकत नाहीत.




