
अमळनेर:- तालुक्यातील सावखेडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कै.भरत साहेबराव कदम यांच्या स्मरणार्थ गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. कै. भरत कदम यांचे विद्यार्थ्यांप्रती असलेले प्रेम आणि आपुलकी जपण्याच्या उद्देशाने त्यांच्या कुटुंबियांनी हा स्तुत्य उपक्रम राबविला.
कै.भरत साहेबराव कदम यांच्या स्मृतीस अभिवादन म्हणून श्रीम.विद्या भरत कदम त्यांचे चिरंजीव पुष्कराज भरतराव कदम आणि समस्त कदम परिवाराच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शालेय जीवनात विद्यार्थ्यांना मदतीचा हात मिळावा आणि त्यांच्या शिक्षणाची ओढ कायम राहावी, या भावनेतून शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता बिऱ्हाडे मॅडम, उपशिक्षिका जयश्री बारड मॅडम आणि स्मिता सोनवणे मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य आणि गावातील ज्येष्ठ मंडळींचे मोलाचे सहकार्य लाभले. कदम परिवाराच्या या सामाजिक बांधिलकीचे संपूर्ण गावातून कौतुक होत आहे.




