
मेंटेनन्स ठेकेदार बाहेरगावी रहिवासी असल्याने दुरुस्तीला विलंब…
अमळनेर:- शहरातील विविध भागांमध्ये उभारण्यात आलेले सोलर हायमास्ट लाईट गेल्या अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत असून रात्रीच्या वेळी नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले हे लाईट बंद असल्याने अपघात आणि गैरप्रकारांची भीती नागरिक व्यक्त करत आहेत.
या संदर्भात नागरिकांनी अमळनेर नगरपालिकेकडे वारंवार तक्रारी दाखल केल्या आहेत. मात्र तक्रार नोंदवूनही दुरुस्तीच्या कामासाठी एक ते दोन महिने प्रतीक्षा करावी लागत असल्याचा अनुभव नागरिक सांगत आहेत. नगरपालिकेच्या कार्यपद्धतीबाबत त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.
सोलर हायमास्ट लाईटच्या देखभाल व मेंटेनन्सचे काम बाहेरगावी राहणाऱ्या ठेकेदाराकडे असल्याने ही समस्या अधिक गंभीर बनली आहे. संबंधित ठेकेदार शहराबाहेर राहत असल्यामुळे किरकोळ बिघाड दुरुस्तीसाठीही विलंब होत असल्याचे चित्र आहे. संपर्क साधल्यावर वेळोवेळी समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. सोलर हायमास्ट लाईटचे मेंटेनन्सचे काम अमळनेर शहरातीलच ठेकेदारास देण्यात यावे किंवा संबंधित ठेकेदाराने शहरातच वास्तव्यास राहणे बंधनकारक करण्यात यावे. यामुळे तात्काळ दुरुस्ती होऊन नागरिकांना दिलासा मिळू शकेल, अशी मागणी नागरिक करीत आहेत. नगरपालिका प्रशासनाने या बाबीकडे तातडीने लक्ष देऊन ठोस उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
प्रतिक्रिया…
शहरातील वार्ड 8 मध्ये अनेक दिवसापासून सोलर हायमस्ट लाईट बंद आहे. तक्रार दिल्यानंतरही दुरुस्तीसाठी येत नाहीत. ठेकेदाराला फोन केले असता घरी इमर्जन्सी आहे, साहित्य उपलब्ध नाही असे उत्तर मिळाले. सदर कामासाठी दोन महिन्याचा पेक्षा जास्त पाठपुरावा करूनही अद्याप लाईट सुरु नाही. – कुलदीप पाटील, नागरिक
प्रतिक्रिया
नगरपालिकेच्या विद्युत विभागामार्फत नादुरुस्त दिव्यांची दुरुस्ती केली जाईल. तसेच ठेका देताना स्थानिक पातळीवर राहणाऱ्यांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न राहील – गणेश शिंदे, मुख्याधिकारी
प्रतिक्रिया
अजून समित्या निवड बाकी असून पंधरा तारखेनंतर समिती गठित करून नागरिकांच्या समस्या सोडवू. – डॉ. परिक्षीत बाविस्कर, नगराध्यक्ष




