
अमळनेर:- येथील प्रताप महाविद्यालयातील (स्वायत्त) मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे निमित्त व राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून दिनांक २२ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ ते १२ या वेळेत सीसीएमसीच्या हॉलमध्ये निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये मतदानाबाबत जागृती निर्माण करणे, लोकशाही मूल्यांचे महत्त्व अधोरेखित करणे तसेच मतदानाच्या अधिकाराचे आणि कर्तव्याचे महत्त्व पटवून देणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता.
महाविद्यालयाच्या विविध ज्ञानशाखांतील जवळपास ७० विद्यार्थी सहभागी झाले होते. ‘जागरूक मतदार, सक्षम लोकशाही’, ‘एका मतदाराचे आत्मवृत्त’, ‘एका मताचे महत्त्व’, ‘आजचे राजकारण आणि मतदार’, ‘मतदारापुढील आव्हाने’, ‘सशक्त राष्ट्र निर्मितीसाठी मतदाराची भूमिका’, विद्यार्थ्यांनी या विषयांवर सखोल व विचारप्रवर्तक निबंध लेखन करून उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या स्पर्धेत रोशनी रवींद्र सोनार हिने प्रथम, साक्षी रवींद्र पाटील हिने द्वितीय तर लखन जयवंत नेरकर याने तृतीय क्रमांक पटकावला. तसेच रमा संजय चव्हाण, दिशा नितीन पाटील आणि रोहिणी उत्तमगीर गोसावी हे उत्तेजनार्थ बक्षीसाचे मानकरी ठरले.
या निबंध स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रा. सागर सैंदाणे आणि प्रा. तुषार पाटील यांनी काम पाहिले. त्यांनी निबंधांचे परीक्षण विषयाची समर्पकता, आशय, भाषा आणि मांडणी या निकषांवर केले.
या स्पर्धेच्या आयोजनात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. डी. जाधव यांचे मार्गदर्शन महत्वाचे होते. तसेच सीसीएमसीचे संचालक डॉ. विजय तूंटे, मराठी विभाग प्रमुख डॉ. ज्ञानेश्वर कांबळे, डॉ. रमेश माने, डॉ. विलास गावित, प्रा. सागर सैंदाणे आणि प्रा. तुषार पाटील प्रा. गोपाळ बडगुजर यांनी या स्पर्धेचे उत्तम संयोजन केले.




