
अमळनेर : सीसीटीव्ही आणि डम डेटा च्या आधारे मोटारसायकली चोरणारे दोन आरोपी अमळनेर पोलिसांनी निष्पन्न केले असून धुळ्याच्या अरबाज शेख साजिद मणियार वय २८ याला अटक केली आहे तर अल्पवयीन आरोपीला नोटीस देऊन सोडून देण्यात आले आहे.
अमळनेर शहरातून मोटारसायकली चोरीस जाण्याचे प्रमाण वाढले होते. पोलिसांनी सीसीटीव्ही नेटवर्क कार्यरत ठेवले असून फुटेज तपासणी केल्यावर त्यांना एक अल्पवयीन मुलगा आणि दुसरा तरुण एका मोटरसायकलवर येताना दिसले आणि अल्पवयीन मुलाने उतरून मोटरसायकल चोरल्याचे दिसले. पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज, हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनार, विनोद संदानशिव, निलेश मोरे, चंद्रकांत पाटील, विनोद सोनवणे,गौरव पाटील,मिलिंद जाधव यांना आरोपीचा शोध घेण्यासाठी पाठवले. पोलिसांनी परिसरातील डम डेटा तपासून भ्रमणध्वनी क्रमांक शोधून काढला. तांत्रिक दृष्ट्या त्याचा शोध घेऊन अल्पवयीन मुलाला पकडले. त्याला विचारपूस केली असता त्याने दोन मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली आणि अरबाज याने एक मोटरसायकल चोरल्याचे सांगितले. पथकाने अरबाज याचा शोध घेऊन त्याला अटक केली. तिन्ही मोटारसायकली त्यांनी धुळे शहरात लपवल्याचे सांगताच पोलिसांनी १ लाख ३० हजार रुपये किमतीच्या तिन्ही मोटारसायकली जप्त केल्या आहेत. आरोपींकडून आणखी काही चोऱ्या उघड होण्याची शक्यता आहे. तपास हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनार ,हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील करीत आहेत.




