
वकिलांच्या चातुर्याने व वेळेवर दिलेल्या ‘सीपीआर’मुळे वाचले प्राण
अमळनेर : तालुक्यातील जिल्हा न्यायालय क्रमांक दोनमध्ये एका कौटुंबिक खटल्याची सुनावणी सुरू असताना एक धक्कादायक प्रसंग घडला. पुणे येथील रहिवाशी आणि मंडळ अधिकारी म्हणून कार्यरत असलेले प्रकाश केरनाथ कांबळे (मंडळ अधिकारी) यांना अचानक गंभीर स्वरूपाचा हृदयविकाराचा झटका (सिव्हिअर अटॅक) आला. झटक्यामुळे ते कोर्टातच कोसळले, आणि काही क्षणांतच परिसरात एकच गोंधळ उडाला.
या प्रसंगाची गंभीरता ओळखून ॲड. प्रशांत संदानशिव यांनी क्षणाचाही विलंब न करता पुढाकार घेतला. त्यांच्या सोबत ॲड. जगदीश बडगुजर, ॲड. राकेश पाटील, शरद ब्रम्हे तसेच न्यायालयाचे अधीक्षक आणि कर्मचारी धावून आले. सर्वांच्या मदतीने कांबळे यांना त्वरित ‘सीपीआर’ (हृदयपुनरुज्जीवन प्रक्रिया) देण्यात आली. काही क्षणांतच कांबळे यांना शुद्ध आली, आणि त्यानंतर ॲड. संदानशिव यांनी स्वतःच्या वाहनाने त्यांना डॉ. बहुगुणे यांच्या दवाखान्यात दाखल केले. डॉ. बहुगुणे यांनी तपासणी करून सध्या कांबळे यांची प्रकृती स्थिर असून धोका टळल्याची माहिती दिली. वकिलांच्या चातुर्याने आणि मानवी संवेदनशीलतेने एका अधिकाऱ्याचा जीव वाचल्याने न्यायालय परिसरात सर्वत्र कौतुकाचा विषय ठरला आहे.




