
अवघ्या एका तासात चोरट्यांना अटक करून पैसा मिळवला परत…
अमळनेर : पैसे पडल्याचे भासवून अडत व्यापाऱ्यांची मोटरसायकलवर लावलेली पिशवी लांबवणाऱ्या आरोपीला अवघ्या एका तासात पोलिसांनी अटक करून चोरीस गेलेला पैसा परत मिळवला आहे.
बहादरपूर रस्त्यावरील झामी चौक येथील अडत व्यापारी आण्णा साहेबराव महाजन हे २ रोजी दुपारी १२:३० वाजता आपली मोटरसायकल क्रमांक एम एच १९ डी एक्स ४०५७ वर २ लाख ८ हजार रुपये घेऊन बँकेत भरायला गेले. १ लाख ३० हजार आयसीआयसीआय बँकेत भरणा केल्यावर ते महाराष्ट्र बँकेत गेले. दुपारी १:५० ला ते त्यांच्याजवलील उरलेले ७८ हजार रुपये असलेली पिशवी घेऊन बँकेच्या बाहेर पडले असताना त्यांना एक जणाने पैसे खाली पडल्याचे सांगितले आणि आण्णा पैसे उचलायला खाली वाकले तोच तो इसम मोटरसायकलला लावलेली पिशवी घेऊन पळाला. घटनेचे वृत्त कळताच पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज , हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनार , प्रशांत पाटील , उज्वल म्हस्के , विनोद संदानशिव ,नितीन मनोरे याना सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीचा शोध घेण्यास सांगितले. पथकाने फुटेज तपासले असता तीन चार आरोपी असल्याचे समजले. आरोपींनी चोपड्याकडे पलायन केल्याचे समजल्यावर शोधपथकाने त्यांचा पाठलाग सुरू केला. तसेच तातडीने चोपडा पोलिसांना संदेश देण्यात आला. तिकडून चोपडा पोलीस वेले गावाजवळ थांबलेले होते. पोलिसांनी त्यांना थांबवून ठेवले तोपर्यंत अमळनेर पोलिसांनी त्यांच्यावर झडप घातली. अवघ्या एका तासात आरोपीना पकडण्यात आले. त्यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी खाक्या दाखवताच त्यांनी त्यांची शीनु नावे बालु बारगुंडा ,शिवकुमार व्यंकटस्वामी बारगुंडा ,गणेश शुबरमनी तेली रा. अमरनगर उज्जैन मध्यप्रदेश अशी सांगितले. अमळनेर पोलीस स्टेशनला तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनार करीत आहेत.




