
अमळनेर : घरमालक लग्नाला गेलेले असताना अज्ञात चोरट्यानी घर फोडून घरातील ६६ हजार रुपयांचे दागिने चोरून नेल्याची घटना २ रोजी पहाटे उघडकीस आली.
मोईनखान हबीबखान पठाण रा गांधलीपुरा चौकीजवळ यांचे गरीबनवाज चौकात मेडिकल दुकान असून ते ३१ रोजी रात्री नातेवाईकांच्या लग्नाला सुरत (गुजरात ) येथे गेले होते. २ रोजी पहाटे ते परत आले असता त्यांना घरातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले. कपाटाचे कुलूप तोडलेले दिसले. लॉकर चे पण कुलूप तोडलेले आढळले. वरच्या मजल्यावरील देखील दोन्ही कपाटाचे कुलूप तोडलेले दिसले. दरम्यान वरच्या मजल्याच्या खोलीच्या मागच्या दाराचे आणि खालच्या मजल्यावर देखील घराच्या मागच्या दाराचे कडी कोंडा कुलूप तोडलेले आढळून आले. घरातील १२ ग्राम वजनाचे सोन्याचे नाणे व अंगठी , ५ हजार रुपयांची चांदी , १ हजार रुपये चांदीचे कडे असे एकूण ६६ हजार रुपयांचे दागिने चोरीस गेले आहेत. अज्ञात चोरट्याविरुद्ध अमळनेर पोलीस स्टेशनला ३३१(४) ,३३१(५) ,३०५ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील करीत आहेत.



