
अमळनेर:-खाद्याच्या शोधात धावत असताना शेतातील विहिरीत पडल्याने एका 2 वर्षीय काळवीटाचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक 11 रोजी चिमनपुरी पिंपळे येथे घडली.
पिंपळे येथील शेतकरी दिलीप पंडित पाटील हे संध्याकाळच्या सुमारास त्यांच्या माळन नदी शेजारील शेतात गेले होते, नंतर ते विहीर पाहण्यासाठी गेले असता त्यांना विहिरीत काळवीट मृत अवस्थेत पडलेले दिसून आले. त्यांनी लागलीच सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील , माजी उपसरपंच सतीश पाटील यांना बोलवून वनविभागाशी संपर्क साधला. मारवड येथील डॉ. विलास पाटील यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क करून चिमणपुरी पिंपळे गावात पाठवले.सायंकाळी उशिरा वन रक्षक दुर्गदास वानखेडे, प्रवीण पाटील, समाधान पाटील,मयूर पाटील आदींनी घटनास्थळी पोहोचून ग्रामस्थांच्या मदतीने मृत झालेल्या काळवीटास बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते.दरम्यान अन्नपाण्याच्या शोधत ते असताना धावत असताना विहिरीचा अंदाज न आल्याने विहिरीत पडून त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज वन कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला.




