
अमळनेर :- शहरातील संताजी नगर परिसरात मंगळवार, दि.१० रोजी दुपारी सुमारे ४.३० वाजेच्या सुमारास एका सेफ्टी टॅंकमध्ये गाय पडल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात नागरिकांनी गायीला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले केले. परंतु साहित्य अभावी निष्फळ ठरले. त्यानंतर याबाबतची माहिती भटू पाटील यांनी तत्काळ अमळनेर नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाला दूरध्वनीद्वारे दिली. माहिती मिळताच मुख्याधिकारी श्री. गणेश शिंदे यांच्या आदेशानुसार अग्निशमन विभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
सदर सेफ्टी टॅंक पाण्याने भरलेला असल्याने गायीला बाहेर काढणे आव्हानात्मक होते. मात्र अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत योग्य ती साधने व दोरांच्या साहाय्याने बचावकार्य हाती घेतले. काही वेळाच्या अथक प्रयत्नांनंतर गायीची सुखरूप सुटका करण्यात यश आले.
या बचाव मोहिमेत अग्निशमन अधिकारी गणेश गोसावी, फारुक शेख, फायरमन दिनेश बिऱ्हाडे व आकाश संदानशिव यांनी तत्परतेने काम करत गायीचा जीव वाचवला. त्यांच्या या कार्याबद्दल संताजी नगर परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत अग्निशमन दलाचे आभार मानले.




