
अमळनेर : पुन्हा एकदा समाज कंटकांच्या बेपर्वाईने अंबर्शी टेकडीवर आग लागल्याने ५० ते ६० झाडे जळून नुकसान झाले. टेकडी प्रेमी आणि पालिकेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग नियंत्रणात आणली.
सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास टेकडीच्या खालच्या बाजूला आग लागली. रमेश कंजर , नरेश कांबळे , सुरेश भावसार यांनी सुरुवातीला आग विझवण्याचे प्रयत्न केले त्यांनंतर मुख्याधिकारी गणेश शिंदे यांना कळवण्यात आले. त्यांनी अग्निशमन दल पाठवले , दलप्रमुख गणेश गोसावी , दिनेश बिऱ्हाडे , फारुख शेख , जफर पठाण , भिका संदानशिव ,आकाश संदानशिव यांनी घटनास्थळी पोहचवून आग आटोक्यात आणली. अन्यथा आगीत आणखी काही झाडे जळून खाक झाली असती.
अंबर्शी टेकडी हे निसर्गरम्य स्थान असून पालिकेचे जल शुद्धीकरण केंद्र देखील आहे. दरवर्षी याठिकाणी झाडे लावली जातात मात्र समाज कंटकांमुळे , बिडी ,सिगारेट आणि गांजा पिणारे याठिकाणी पेटती काडी टाकून निघून जातात आणि आग लागून दरवर्षी झाडे जळतात. पालिका आणि पोलीस प्रशासनने काहीतरी उपाययोजना राबवून अशा समाज कंटकाना आळा घालावा आणि पर्यावरणाचे रक्षण करावे अशी मागणी होत आहे.




