
अमळनेर : महाशिवरात्रीनिमित्त येथील श्री मंगळग्रह मंदिरात रविवार, दि. 15 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता गोरज मुहूर्तावर विश्व कल्याणासाठी लघू रुद्राभिषेक, शृंगार सेवा करण्यात आली. बाजार समितीचे संचालक सचिन पाटील यांनी सपत्निक वेदमंत्रांच्या जयघोषात अभिषेक केला. श्री मंगळेश्वर महादेवांना सेवा अर्पण करण्यात आली.
शुभम वैष्णव गुरुजी, सारंग पाठक गुरुजी, जयेंद्र वैद्य गुरुजी, प्रसाद भंडारी गुरुजी, अथर्व कुळकर्णी, परशूराम शर्मा, वैभव लोकाक्षी, चंद्रकांत जोशी, मेहूल कुळकर्णी आदींनी पौरोहित्य केले. सायंकाळी 7 ते 9 या वेळात भक्तीमय वातावरणात भजन संध्या कार्यक्रम झाला. यावेळी भाविकांची मोठी उपस्थिती होती. महादेवांच्या नामस्मरणाने परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. श्री मंगळ ग्रह देवता व श्री मंगळेश्वर महादेव मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली. दरम्यान, आज श्री मंगळ ग्रह मंदिरात श्री मंगळेश्वर महादेवांच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली होती.




