
अमळनेर : भारतीय शेतकऱ्यांचा माल अमेरिकेत गेल्यानंतर त्याला १८ टक्के कर लावला जात असल्याने भारत अमेरिका करार तात्काळ रद्द करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन राष्ट्रीय किसान काँग्रेस तर्फे उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे याना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, भारताने अमेरिकेबरोबर केलेला आयात निर्यात करार भारतीय शेतकऱ्यांच्या पोटावर लाथ मारणारा आहे. आणि देशाच्या अन्न सुरक्षेला धोका निर्माण करणारा आहे. अमेरिकेतून भारतात येणाऱ्या शेती मालाला शून्य टक्के कर आणि भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या शेतीमालाला १८ टक्के जीएसटी कर हा शेतकऱ्यांचा विश्वास घात आहे. यामुळे कापूस उत्पादक शेतकरी कर्जाच्या खाईत जाईल तर दूध उत्पादक व दुग्ध व्यवसाय पूर्णपणे उध्वस्त होईल म्हणून करार रद्द करावेत , भारतीयांवरील कर हटवावेत , भारतीय शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी आयात नियंत्रणाचे कठोर धोरण लागू करावे सर्व शेत मालाला कायदेशीर हमीभाव द्यावा अशी मागणी जिल्हा कार्याध्यक्ष प्रा सुभाष पाटील , प्रा दिनेश पवार , सुरेश पिरन पाटील , सुनील भालेराव पाटील , प्रताप नगराज पाटील , किशोर संतोष पाटील ,नारायण झोपडू पाटील आदि शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
त्याचप्रमाणे तालुक्यातील मका व ज्वारी खरेदीचे (एम एस पी) उद्दिष्ट वाढवून द्यावे या मागणीचे निवेदनही उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे याना देण्यात आले.
अमळनेर तालुक्याला दिलेले उद्दिष्ट अत्यंत तोकडे आणि अन्यायकारक आहे. क्षेत्रफळ आणि उत्पादन बाबत अमळनेर तालुक्यात लाखो हेक्टर मका व ज्वारीचे पीक घेतले जाते. शासनाने खरीप हंगामासाठी अत्यल्प उद्दिष्ट दिले आहे. तालुक्यातील शेतकरी रब्बी हंगामातही मका आणि ज्वारी लागवड करतात. उद्दिष्ट कमी असल्याने शेतकऱ्यांना आपला माल कमी भावात व्यापाऱ्यांना विकावा लागत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे तालुक्यातील लागवडीचे क्षेत्र पाहून उद्दिष्ट देण्यात यावे अशीही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.




