
अमळनेर (प्रतिनिधी):- तालुक्यातील ११ केंद्रांवर दहावीच्या मराठी पेपरच्या पहिल्याच दिवशी ६३ विद्यार्थ्यांनी दांडी मारली असून ३३४२ विद्यार्थ्यांनी सुरळीत पणे पेपर दिला आहे.
अमळनेर तालुक्यात दहावी बोर्डाच्या परीक्षेसाठी एकूण ११ केंद्रांवर मराठी माध्यमाचे ३२२६ तर उर्दू माध्यमाचे १७९ विद्यार्थी प्रविष्ट होते यापैकी मराठी माध्यमाला ६१ तर उर्दू माध्यमाला २ विद्यार्थी गैरहजर होते.
अमळनेर शहरात डी.आर.कन्याशाळा, जी.एस.हायस्कूल,साने गुरुजी हायस्कूल,जय योगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा,एन. टी.मुंदडा माध्यमिक शाळा तर ग्रामीण भागातील मारवड,वावडे, अमळगाव, शिरूड, कळमसरे, दहिवद या केंद्रांवर दहावीच्या परीक्षेला सुरवात झालेली आहे.
एस.एस. सी. बोर्डाच्या सूचनांनुसार या वर्षी सीसीटीव्ही च्या निगराणीत परीक्षा सुरळीतपणे पार पडत असून गैरमार्गाला आळा बसलेला आहे.तालुक्यातील अमळगाव,वावडे व दहिवद येथील केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित नसल्याने येथील पर्यवेक्षण करणाऱ्या शिक्षकांची अदलाबदली करण्यात आलेली आहे तसेच त्या केंद्रांवर झूम मीटिंग च्या सहाय्याने परीक्षा घेतली जात आहे.मराठीच्या पहिल्याच पेपरला प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांनी डी. आर.कन्याशाळा व साने गुरुजी केंद्रांवर भेटी दिल्या.तालुका परीक्षा नियंत्रक रावसाहेब पाटील यांनी परीक्षा सुरळीत सुरू असल्याचे सांगितले.




