
अमळनेर : क्रिप्टो करन्सी ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करून नफ्याचे आमिष दाखवत डॉ. अनिल शिंदे यांची १ कोटी ६५ लाख ५७ हजार २०४ रुपयांमध्ये ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. हा प्रकार २९ जानेवारी ते १९ फेब्रुवारीदरम्यान घडला. डॉ. शिंदे यांच्या तक्रारीवरून सायबर पोलिस ठाण्यात झासी पाटील या महिलेसह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. फेसबुकवर आलेली ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ स्वीकारल्यानंतर हा प्रकार घडला.
डॉ. शिंदे यांना २९ जानेवारी रोजी झासी पाटील नामक महिलेची फेसबुकवर ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ आली. ती त्यांनी स्वीकारल्यानंतर महिलेने एका इंटरनॅशनल ट्रेडिंगबद्दल माहिती दिली. ९ फेब्रुवारी रोजी महिलेने संपर्क साधून क्रिप्टो करन्सी ट्रेडिंगमध्ये मोठा नफा मिळेल, असे आमिष दाखविले. लिंक पाठवून अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले.
डॉक्टरांनी केलेल्या एकूण १ कोटी ६५ लाख ५७ हजार २०४ रुपयांच्या गुंतवणुकीतून ३ कोटी ९१ लाख ८७ हजार ७६६ रुपये नफा झाल्याचे त्यांना दिसत होते. ती रक्कम काढण्याविषयी त्यांनी सांगितले असता त्यासाठी कंपनीची २० टक्के व्हेरिफिकेशन फी म्हणून ६५ लाख ३१ हजार २९४ रुपये भरावे लागतील, असे सांगण्यात आले.
आता पैसे नसल्याचे डॉक्टरांनी २ सांगत भरलेले पैसे परत मिळण्याची विनंती केली. मात्र, उडवाउडवीची उत्तरे देत पैसे देण्यास नकार देण्यात आला. त्यानंतर डॉ. शिंदे यांनी याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.दरम्यान झासी पाटील व तिच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सतीश गोराडे करीत आहेत.




