
अमळनेर : नारळाच्या झाडावर नारळ तोडायला चढलेल्या सेवकाचे पायडल मशीनच बंद पडले आणि सेवक उंच झाडावर बराच वेळ अडकून पडल्याची घटना स्वामींनारायण मंदिरात २७ रोजी घडली. अखेर अग्निशमन दलाने उंचावर अडकून पडलेल्या सेवकाला सुखरूप खाली उतरवले.

येथील स्वामीनारायण मंदिरात नारळाची उंच झाडे आहेत. नारळ काढण्यासाठी तेथील एक सेवक पायडल मशीन ने वर चढला आणि आणि त्याचे पायडल मशीन बंद पडले. त्यामुळे झाडावर चढलेला सेवक झाडावरच अडकून पडला. त्याला उतरता येत नसल्याने तो एक तास तसाच थांबून होता. दुसऱ्या कोणाला झाडावर चढता येत नसल्याने सारेच जण चिंतेत पडले. अखेर मंदिरातील स्वामींनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांना कळवले. त्यांनी तातडीने अग्निशमन दलाचे अधिकारी गणेश गोसावी ,दिनेश बिऱ्हाडे , फारूख शेख , सत्येन संदानशिव , मच्छीन्द्र चौधरी ,भिका संदानशिव याना पाठवले. अग्निशमन दलाची शिडी व सेफ्टी बेल्ट लावून दोरखंडाच्या साहाय्याने अखेर झाडावर अडकलेल्या सेवकास सुखरूप खाली उतरवण्यात आले.




