
येत्या दोन महिन्यात एक दिवसाआड पाणीपुरवठा – माजी आ.शिरीष चौधरी
अमळनेर:-शहरात 24 ते 25 हजार मालमत्ता धारक असून 12 हजारच नळधारक आहेत म्हणजेच पाणी चोरी 70 टक्के होत आहे,अवैध नळधारकांना आपले कनेक्शन नियमित करण्याची एक महिन्याची संधी असून त्यांनी नियमित करून घ्यावेत अन्यथा संबंधित व्यक्तींवर गुन्हे दाखल होणार.येत्या दोन महिन्यात एक दिवसाआड पाणी आम्ही देणार असून निवडणुकीतील वचननाम्याची पूर्ती करण्यास सुरुवात झाली असल्याची भावना माजी आ.शिरीष चौधरी यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

पुढे बोलताना चौधरी म्हणाले की, पाणीपुरवठा विभागाकडे आमचे विशेष लक्ष असून नागरिकांनी प्रायव्हेट प्लंबर कडून नळ कनेक्शन न घेता पालिकेशी थेट संपर्क साधावा अन्यथा कारवाईच्या गोत्यात येऊ शकतात.आधी 6 ते 7 दिवसाआड पाणी येत होते आता आम्ही चार दिवसाआड पाणी देत आहोत, हद्दवाढ झालेल्या परिसरात देखील व्यवस्थित पाणीपुरवठा होतोय.आगामी काळात धुळे रोड ते पिंपळे रोड दरम्यान, आर के नगर ते डी डी नगर दरम्यान आणि राजाराम नगर परिसरात अश्या तीन ठिकाणी नवीन जलकुंभ करण्याचे नियोजन आहे.जळोद येथे हिरा उद्योग समूहाने गेल्या काळात 14 बोअर केले होते त्यापैकी आज 2 बोअर सुरू आहेत.आता पुन्हा 10 बोअर करण्याचे नियोजन असून या उन्हाळ्यात एकही आवर्तन घ्यावे लागणार नाही असे आमचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पाणीपुरवठ्याचा ठेका दिला असताना पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात कमी झाली यात आमचे काही कर्मचारी देखील दोषी आहेत,जे दोषी ठरतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच अमळनेर नगरी बदलवायचा वचननामा आम्ही दिला असल्याने त्याची पूर्ती करणे सुरू केले आहे, पालिकेच्या पहिल्याच सभेत मोफत अंत्यविधीसाठी मोफत गौरी देण्यास सुरवात केली आहे.अतिक्रमण धारक वर्षेनुवर्षं ज्या जागेत राहत आहेत पैसे भरुन त्यांच्या नावावर जागा करण्याचा ठराव आम्ही केला आहे.230 स्क्वेअर फूट जागेत घर असेल तर त्यांचा टॅक्स माफ करण्याचा ठराव झाला आहे.यासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब लवकरच जी आर काढून न्याय देतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.याशिवाय प्रत्येक प्रभागात खुले भूखंड विकसित करणार असून ,शहरात एक कोटी निधीतुन नमो गार्डन विकसित करणार आहे.बोरी नदी काठावर 31 फूट उंच विठ्ठल मूर्तीचे निर्माण करणार आहोत.शहरात कोणत्याही चौकात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे स्मारक उभे करण्याचा प्रयत्न आहे.यात विरोधकांनी सहकार्य करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.नगराध्यक्ष डॉ परीक्षित बाविस्कर डॉक्टर असल्याने 100 बेडचे हॉस्पिटल शहरात निर्माण करणार असून याठिकाणी गोरगरिबांवर मोफत इलाज केले जातील असे त्यांनी सांगितले.
यावेळी नगराध्यक्ष डॉ परीक्षित बाविस्कर,उपनगराध्यक्ष प्रशांत निकम,बांधकाम सभापती दादा पवार,पाणी पुरवठा सभापती कैलास पाटील,आरोग्य सभापती रामकृष्ण पाटील,शिक्षण सभापती नावेद शेख,नगरसेवक गुलाब पाटील, महेश देशमुख,सूरज परदेशी,भरतसिंग परदेशी,राहुल कंजर उपस्थित होते.
नमो गार्डन ताडेपुरा भागात नाहीच
यासंदर्भात उपनगराध्यक्ष प्रशांत बोलताना म्हणाले की नमो गार्डन ताडेपुरा नाल्याजवळ विकसित करावे अशी विरोधकांची मागणी आहे.परंतु नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करता तेथे शहरातील लोक जाणार नाहीत,ताडे तलाव नैसर्गिक स्रोत नसून ते गटारीचे पाणी असल्याने दुर्गंधीचा विचार करता तेथे गार्डन विकसित करणे योग्य नाही त्याऐवजी शहरात 40 बाय 60 मीटर आकाराचा चांगला भूखंड शोधून तेथे हे गार्डन विकसित केले जाईल,जेथे लहान मुले व अबाल वृद्ध सुरक्षितपणे जाऊ शकतील असे त्यांनी सांगितले.म्हणजेच ताडेपुराजवळ गार्डन चा विषय होणारच नाही हेच त्यांनी स्पष्ट केले आहे.




