
अमळनेर : शहरातील विविध शॉपिंग कॉम्प्लेक्समधील थकबाकीदार गाळेधारकांवर अमळनेर नगरपरिषदेकडून शुक्रवारी (दि.६) कारवाई करण्यात आली. थकीत देयके न भरल्यामुळे एकूण १६ दुकाने सील करण्यात आली.

नगरपरिषदेकडून हशिम जी प्रेमजी मार्केट, आय.यू.डी.पी. मार्केट, साने गुरुजी मार्केट, लालबहादूर शास्त्री मार्केट तसेच संत सखाराम महाराज मार्केट या ठिकाणी तपासणी करण्यात आली. या मार्केटमधील काही गाळेधारकांकडे दीर्घकाळापासून थकबाकी असल्याने नगरपरिषद प्रशासनाने कठोर पाऊल उचलत दुकाने सील केली.
ही कारवाई मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या आदेशान्वये करण्यात आली. यासाठी कर अधिक्षक अनिल बोरसे, कर निरीक्षक लौकिक समशेर, मिळकत विभागातील विजय बागुल, मनोज सोनार व सचिन कदम वसुली विभाग यांच्या पथकाने ही कारवाई केली.
नगरपरिषदेकडून थकबाकीदार गाळेधारकांना देयके भरण्याबाबत यापूर्वी वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र प्रतिसाद न मिळाल्याने अखेर ही कारवाई करण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले. तसेच इतर थकबाकीदारांनी तातडीने देयके भरावीत, अन्यथा अशाच प्रकारची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही नगरपरिषदेकडून देण्यात आला आहे.




