
अमळनेर : मुख्य स्मशानभूमीचे शेड अपूर्णावस्थेत असल्याने नागरिकांना बेड सोडून बाहेर खालच्या बाजूला अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. त्यामुळे प्रेताची विटंबना होत असल्याची ओरड नागरिकांनी केली आहे. तर निधी असूनही बिल मिळत नसल्याची तक्रार ठेकेदाराने केली आहे.

अमळनेर नगरपरिषदेला स्मशान भूमीचे नवीन शेड बांधण्यासाठी सुमारे एक कोटींची मंजुरी मिळाली होती. या कामाचा ठेका मिहीर हेमंत पवार यांना देण्यात आला होता. ठेकेदाराने ९० टक्के शेड चे काम पूर्ण केले असून थोडे काम बाकी ठेवल्याने त्या शेडचा वापर होऊ शकत नाही. अमळनेर शहर खूप मोठे असून ८० टक्के अंत्यसंस्कार चोपडा रस्त्यावरील शनीपेठ स्मशान भूमीत केले जातात. मात्र आधीचे शेड देखील अपूर्ण पडत असल्याने अनेक नागरिक नाईलाजास्तव आपल्या नातेवाईकांचे अंत्यसंस्कार इतरत्र खालच्या बाजूला बेड सोडून करीत आहेत. अखेरच्या क्षणी देखील योग्य जागा मिळत नसल्याने प्रेताची हेटाळणी होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला असून ठेकेदाराला काम पूर्ण करण्यास सांगावे अशी मागणी होत आहे.
दरम्यान ठेकेदार मिहीर पवार याने सांगितले की , जवळपास ९० टक्के शेडचे काम पूर्ण झाले आहे. झालेल्या कामाचा मोबदला टप्प्याटप्प्याने मिळाले तर काम पूर्ण करता येईल. जिल्हा नियोजन विभागाने या कामासाठी पालिकेला १ जानेवारी रोजीच चेक नंबर ८६९५८ नुसार ४९ लाख ९५ हजार रुपयांचा निधी दिला आहे. मात्र तरीही पालिकेने बिल अदा केलेले नाही. उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी बिल अदा करण्यात यावे अशी मागणी करणारे पत्र पालिकेला दिले आहे असेही मिहीर पवार याने सांगितले.
प्रतिक्रिया…
कामाचे ऑडिट बाकी आहे, निधी प्राप्त झाला आहे. ऑडिट झाल्यानंतर बिल अदा केले जाईल. ठेकेदाराला काम करण्याचे आदेश दिले आहेत. – गणेश शिंदे, मुख्याधिकारी




