
सापडलेले सोने आबा पाटील यांनी केले नवरदेवाच्या कुटुंबाकडे सुपूर्द…
अमळनेर : पोलिसांच्या प्रसंगावधान आणि एका सामान्य नागरिकाच्या प्रामाणिकपणामुळे लग्नघरातील चोरी गेलेले सुमारे ७ लाख रुपये किमतीचे चार तोळे सोने पुन्हा कुटुंबाला मिळाल्याची घटना अमळनेर तालुक्यातील पिंपळे येथे घडली. बीट हवालदार कैलास शिंदे व सागर पाटील यांच्या कामगिरी बरोबरच गावातील ऑटो रिक्षा चालक आबा पोपट पाटील यांच्या प्रामाणिकपणामुळे ही घटना सुखरूप मार्गी लागली.

पिंपळे येथील शेतकरी जिजाबराव शंकर पाटील यांच्या मुलाचे लग्न ७ फेब्रुवारी रोजी असल्याने घरात उत्साहाचे वातावरण होते. ६ फेब्रुवारी रोजी हळदीचा कार्यक्रम पार पडून रात्री जेवणानंतर नाचगाण्याचा कार्यक्रम सुरू असताना नवरदेवाच्या आजींना वरच्या मजल्यावरील कपाटाचे लॉक उघडे असल्याचे दिसले. तपासणी केली असता कपाटातील चार तोळे सोने व सुमारे ४० हजार रुपये रोख रक्कम गायब असल्याचे लक्षात आले.
या घटनेमुळे लग्नघरात एकच खळबळ उडाली. तातडीने पोलिसांना कळविण्यात आले. बीट हवालदार कैलास शिंदे व सागर पाटील घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी उपस्थितांना शांत राहण्याचे आवाहन करत लग्नाचा कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यास सांगितले. यावेळी पोलिसांनी आरोपीचा cctv फुटेजवरून माग काढल्याचे सांगून चोरटा आमच्या लक्षात आला आहे. काळ्जी करू नका त्याच्यावर मानसिक दबाव निर्माण केला.
पोलिसांच्या या कामगिरी मुळे घाबरलेल्या अज्ञात व्यक्तीने त्याच रात्री गावातील पशुवैद्यकीय दवाखान्याजवळील एका ठिकाणी सोन्याचे दागिने टाकून पलायन केले.दुसऱ्या दिवशी सकाळी गावातील ऑटो रिक्षा चालक व सर्वांच्या ओळखीचे आबा पोपट पाटील त्या ठिकाणी गेले असता त्यांना सोन्याचे दागिने दिसले.
आबा पाटील यांनी तात्काळ गावकऱ्यांना बोलावून सर्वांसमोर ते सोने मोजले आणि नवरदेवाच्या वडिलांच्या स्वाधीन केले. हरवलेले सोने परत मिळाल्याने जिजाबराव पाटील यांच्या कुटुंबीयांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.
लग्नमंडपातच गावकऱ्यांच्या उपस्थितीत आबा पोपट पाटील यांचा सत्कार करण्यात आला. पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे आरोपीवर दबाव निर्माण झाला तर आबा पाटील यांच्या प्रामाणिकपणामुळे हरवलेले सोने योग्य मालकापर्यंत पोहोचले. या घटनेमुळे परिसरात पोलिस व नागरिकांच्या सहकार्याचे सुंदर उदाहरण पाहायला मिळाले.




