
अमळनेर : वारंवार मागणी करून नोटिसा देऊनही थकबाकी न भरणाऱ्या २३ थकबाकीदार नागरिकांचे नळ कनेक्शन पालिकेतर्फे कट करण्यात आले आहे.

ढेकू रोडवरील लक्ष्मीनगर , गुलमोहर भागातील नागरिकांकडे सुमारे १० लाख रुपये पाणी पट्टी कर बाकी होता. मार्च महिन्याचे दहा दिवस बाकी झाले तरी अजूनही नागरिकांकडे सुमारे ५ कोटींची थकबाकी आहे. पालिकेने यापूर्वी नोटिसा देऊन कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष भेटून देखील थकबाकी भरली जात नव्हती म्हणून अखेर मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी कठोर पावले उचलत थकबाकीदारांचे दुकाने सील करणे , नळ कनेक्शन कट करणे आदी प्रकारची कारवाई सुरू केली आहे. १० मार्च रोजी वसुली पथकातील कर निरीक्षक लौकिक समशेर , वरिष्ठ लिपिक सतीश बडगुजर, बाळकृष्ण जाधव , सागर पवार , आदित्य संदानशिव , निखिल संदानशीव यांच्या पथकाला थकबाकीदारांचे नळ कनेक्शन बंद करायला पाठवले. काही लोकांनी जागीच थकबाकी भरल्याने त्यांना सवलत देण्यात आली तर ज्यांनी थकबाकी भरली नाही अशा २३ लोकांचे नळ कनेक्शन कट करण्यात आले.
प्रतिक्रिया…
थकबाकीदार नागरिकांनी तातडीने थकबाकी कर भरणा करावा अन्यथा गाळे सील करणे , नळ कनेक्शन कट करणे , मालमत्ता बोजा चढवणे आदी प्रकारची कारवाई केली जाईल.-गणेश शिंदे ,मुख्याधिकारी अमळनेर नगरपरिषद
प्रतिक्रिया…
अनेक नागरिकांचे बोगस नळ कनेक्शन असल्याचेही निदर्शनास आले आहे. त्याची देखील शोध मोहीम सुरू आहे. नागरिकांनी अपमानित होऊन कारवाई ओढवण्यापेक्षा नळ कनेक्शन नियमित करून घ्यावे तसेच थकबाकीदारांनी नियमित भरणा करावा-डॉ परिक्षीत बाविस्कर, नगराध्यक्ष अमळनेर




